मार्गदर्शक सूचना सरकारने घेतल्या मागे ः सावधपणे शेअर करावा आधार क्रमांक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुठल्याही संस्था किंवा संघटनेला आधारची प्रत देऊ नये असे युनिय आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच युआयडीएआयकडून लोकांना सांगण्यात आले होते. आधारचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त करत ही सूचना करण्यात आली होती. सरकारने आता ही सूचना मागे घेतली आहे.
युआयडीएआयकडून 27 मे रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये फोटोशॉपद्वारे आधारकार्डचा कुणीही गैरवापर करू शकतो असे म्हटले गेले होते. चुकीच्या व्याख्यांची शक्यता पाहता या मार्गदर्शक सूचना तत्काळ प्रभावाने मागे घेतल्या जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.
स्वतःचा आधार क्रमांक शेअर करताना खबरदारी घ्यावी असा सल्ला युआयडीएआयकडून देण्यात आला आहे. आधार आयडेंटिटी ऑथेंटिकेशन इकोसिस्टीमने आधारधारकाची ओळख आणि गोपनीयतेच्या सुरक्षेसाठी पुरेशा सुविधा प्रदान केल्या आहेत असे सांगण्यात आले.
युआयडीएआयने लोकांना मास्क्ड आधारच्या वापराचा सल्ला दिला होता. मास्क्ड आधारमध्ये आधारचे पूर्ण 12 अंक दिसून येत नाहीत, केवळ अखेरचे 4 अंक दिसतात. तसेच मास्क्ड आधार युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवरूनच डाउनलोड करता येऊ शकते.
ई-आधार डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कॅफे/कियोस्कमध्ये सार्वजनिक संगणकाचा (कॉम्प्युटर) वापर करणे टाळावे. तसेच ई-आधारच्या सर्व डाउनलोड करण्यात आलेल्या प्रती संबंधित संगणकामधून हटविण्यात याव्यात असे युआयडीएआयने म्हटले होते.
हॉटेल, चित्रपटगृह किंवा विना परवाना असलेल्या खासगी संस्थांना आधारकार्डच्या प्रती जमा करणे किंवा बाळगण्याची अनुमती नाही. हा प्रकार आधार अधिनियम 2016 अंतर्गत गुन्हा आहे. एखाद्या खासगी संस्थेने आधारकार्डची मागणी केल्यास संबंधित संस्थेकडे युआयडीएआयकडून वैध परवाना प्राप्त आहे की नाही याची पडताळणी करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली होती.