आज चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध साखळी लढत ः आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नईसाठी औपचारिक सामना
वृत्तसंस्था/ मुंबई
सध्या सुरू असलेली आयपीएल स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत आघाडीवर असलेला गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किग्ज यांच्यातील सामना रविवारी येथे खेळविला जाणार आहे. स्पर्धेच्या प्ले ऑफ गटात स्थान मिळविणारा गुजरातचा संघ आता पहिल्या दोनमधील स्थान कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. आजच्या सामन्याला दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होईल.
हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने या स्पर्धेत 12 सामन्यांतून सर्वाधिक म्हणजे 18 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले आहे. त्यांचे प्राथमिक फेरीतील अद्याप दोन सामने बाकी आहेत. रविवारच्या सामन्यात गुजरात संघ विजय मिळविण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यात त्यांनी आणखी दोन गुण मिळविले तर या संघाचे आघाडीच्या पहिल्या दोन संघांतील स्थान अधिक मजबूत होईल. चेन्नई संघाच्या दृष्टीने हा सामना केवळ औपचारिकता राहील.
स्पर्धेच्या गुणतक्त्यात माजी विजेता चेन्नई सुपर किंग्ज शेवटून दुसऱया स्थानावर आहे. गुजरात संघाने यापूर्वी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 62 धावांनी दणदणीत पराभव करून प्ले ऑफ गटातील आपले स्थान निश्चित केले आहे. चेन्नई संघाला यापूर्वीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पाच गडय़ांनी हार पत्करावी लागली होती.
गुजरात संघाच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने शुभमन गिल, कर्णधार हार्दिक पंडय़ा, डेव्हिड मिलर, साहा आणि राहुल तेवातिया यांच्यावर असून त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे. या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जाते. नाजूक स्थितीमध्ये गुजरातचा संघ चिवट प्रतिकार करू शकतो याची प्रचिती यापूर्वी बऱयाच सामन्यांत आली आहे. यापूर्वीच्या सामन्यात गुजरात संघातील सलामीचा फलंदाज गिलने नाबाद 63 धावा झळकविल्या. या सामन्यात गिल शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला होता.
कर्णधार पंडय़ा, मिलर आणि तेवातिया यांच्याकडून उर्वरित सामन्यात अधिक धावा होतील अशी आशा या संघाच्या व्यवस्थापकाला वाटते. मोहम्मद शमी, फर्ग्युसन, रशीद खान हे गुजरात संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. शमीने या संघातर्फे आतापर्यंत सर्वाधिक 16 बळी मिळविले आहेत. फर्ग्युसन स्विंग गोलंदाजीवर अधिक भर देत असल्याने प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना अवघड जाते. फिरकी गोलंदाज रशीद खानने यापूर्वीच्या सामन्यात चार गडी बाद करून आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. यश दयाल हा गुजरात संघातील आणखी एक गोलंदाज असून साई किशोरची रशीदला बऱयापैकी साथ मिळत आहे.
2022 आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बलाढय़ चेन्नई संघाला पहिल्या सामन्यापासूनच सूर मिळाला नाही. कर्णधार धोनीने आपले कर्णधारपद सोडून रविंद्र जडेजाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. पण, जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाला यश मिळाले नाही. कप्तानपदाच्या जबाबदारीचे ओझे जडेजाला पेलविले नाही त्यामुळे चेन्नई संघाच्या नेतृत्वामध्ये पुन्हा बदल करण्यात आला व अनुभवी धोनीकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यान चेन्नई आणि जडेजा यांच्यात मतभेद झाल्याच्या अफवा पसरल्या. पण, ही वस्तुस्थिती खरी नसल्याचे सांगण्यात आले. दुखापतीमुळे जडेजा आपल्या संघाच्या यापूर्वीच्या सामन्यात खेळू शकला नाही. शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, रॉबिन उथाप्पा, कॉन्वे हे फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहेत. फलंदाजीप्रमाणेच या संघासमोर गोलंदाजीची समस्या निर्माण झाली आहे. दीपक चहर आणि मिल्ने यांच्या गैरहजेरीत चेन्नईची गोलंदाजी प्रभावी हहोत नसल्याचे दिसून येते. मोईन अली आणि महेश तिक्ष्णा यांच्यावर फिरकी गोलंदाजीची भिस्त आहे.
संभाव्य खेळाडू
गुजरात टायटन्स- हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, मिलर, गुरूकिरात सिंग, साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, वेड, आर. गुरबाज, साहा, जोसेफ, दर्शन नळकांडे, फर्ग्युसन, शमी, नूर अहमद, प्रदीप संगवान, रशीद खान, साई किशोर, वरूण ऍरॉन आणि यश दयाल.
चेन्नई सुपरकिंग्स- धोनी (कर्णधार), मोईल अली, गायकवाड, डेव्हॉन ब्रॅव्हो. रायडू, उत्थप्पा, सँटेनर, जॉर्डन, मिल्ने, कॉनव्हे, शिवम दुबे, प्रेटोरियर्स, महेश तिक्ष्णा, राजवर्धन हंगिरगेकर, तुषार देशपांडे, असिफ, हरी निशांत, जगदेशन, सेनापती, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग आणि मुकेश चौधरी.
सामन्याची वेळ ः दु. 3.30 वा.