पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगून जम्मु- काश्मिर या केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीस हजेरी लावणाऱ्या मुळचा गुजरातच्या (Gujrat) तोतया अधिकाऱ्यास स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरणभाई पटेल असे नाव असणाऱ्या या व्यक्तीने आपण पीएमओमधील ( PMO ) अतिरिक्त संचालक असल्याचे सांगितले होते.
श्रीनगरमधील निशात पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, किरण पटेल ( Kiran Patel ) याने स्वताला पंतप्रधान कार्यालयातील अतिरिक्त संचालक असल्याचे सांगून काश्मीर खोऱ्यात तसेच निशात पोलिस स्टेशनच्या हद्दीत वावरत होता. स्थानिक प्रशासनाने त्याला सरकारी पाहुणचार देऊन त्याच्यासाठी झेड-प्लस सुरक्षा कवच, बुलेटप्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) पुरवण्यात आले. तसेच त्याच्यासाठी एका आलिशान हॉटेलमध्ये खोलीही बूक करण्यात आली. या सुविधांचा वापर करून किरण पटेल याने जम्मु- काश्मिर खोऱ्यात अनेक शासकिय दौरे केले. प्रशासनातील अनेक उच्चपदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या.
या तोतया अतिरिक्त महासंचालकाला 10 दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. परंतु त्याच्या अटकेबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. गुरुवारी, न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर या घडामोडींचा तपशील सार्वजनिक झाला.