आयपीएल पदार्पणातच भीमपराक्रम! प्ले-ऑफमध्ये स्थान संपादन करणारा पहिला संघ
सुकृत मोकाशी / पुणे
शुभमन गिलची 63 धावांची नाबाद खेळी आणि रशिद खानच्या (4-24) भेदक गोलंदाजीच्या बळावर गुजरात टायटन्सने लखनौ सुपरजायंट्सला 62 धावांनी धूळ चारत आयपीएल पदार्पणातच प्ले-ऑफमध्ये सर्वप्रथम धडक मारण्याचा भीमपराक्रम गाजवला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर गुजरातने निर्धारित 20 षटकात 4 बाद 144 धावा केल्या. पण, प्रत्युत्तरात लखनौला हे माफक आव्हानही अजिबात पेलवले नाही. त्यांचा डाव 13.5 षटकात अवघ्या 82 धावांमध्येच खुर्दा झाला.
विजयासाठी 145 धावांचे आव्हान असताना लखनौतर्फे दीपक हुडा (27), डी कॉक (11), अवेश खान (12) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. केएल राहुल (8), करण शर्मा (4), कृणाल पंडय़ा (5), आयुष बदोनी (8), स्टोईनिस (2), जेसॉन होल्डर (1), मोहसिन (1) एकेरी धावांवर बाद झाले तर चमीरा एकही चेंडू न खेळता शून्यावर नाबाद राहिला. 4 बळी घेणाऱया रशिदला यश दयाल (2-24), आर. साई किशोर (2-7), शमी (1-5) यांनी उत्तम साथ दिली.
गिलची उत्तम फटकेबाजी
प्रारंभी, वृद्धिमान साहा आणि शुभमन गिलला चांगली सलामी देण्यात अपयश आले. धावसंख्या आठ असताना साहा 5 धावा काढून बाद झाला. अवेश खानकरवी मोहसीन खानने त्याला झेलबाद केले. त्यानंतर 24 धावा फलकावर असताना या सामन्यात संधी देण्यात आलेला मॅथ्यू वेडही 10 धावा काढून बाद झाला. त्याला अवेश खानने डी कॉककरवी बाद केले. पॉवर प्लेच्या पहिल्या सहा षटकात गुजरातने 2 बाद 35 धावा केल्या. यानंतर गिल-हार्दिक पंडय़ा डाव सावरतील असे वाटत असताना हार्दिकच्या रुपाने गुजरातला मोठा झटका बसला. त्याला अवेश खानने 11 धावांवर डी कॉककरवी झेलबाद केले. यावेळी गुजरातची 3 बाद 51 अशी अवस्था झाली होती. त्यामुळे फलंदाजीचा निर्णय अंगलट आल्याचे दिसून आले.

गुजरातच्या पहिल्या दहा षटकात 3 बाद 59 धावा झाल्या होत्या. मिलर आणि गिलने गुजरातचा डाव सावरत 15.3 षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. धावसंख्या 103 असताना मिलर 24 धावा काढून होल्डरचा शिकार ठरला. दरम्यान, एक बाजू लावून धरणाऱया गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर गिल आणि तेवातियाने नाबाद 41 धावांची भागीदारी करत गुजरातला 20 षटकात 4 बाद 144 धावांपर्यंत मजल मारुन दिली. गिल 63 धावांवर नाबाद राहिला तर तेवातियाने नाबाद 22 धावा केल्या. गिलने आपल्या खेळीत सात चौकार लगावले. लखनौकडून अवेशने दोन बळी घेतले. मोहसिन खान आणि होल्डरने प्रत्येकी एक बळी टिपला.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगला. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स ः 20 षटकात 4 बाद 144 (शुभमन गिल 49 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 63, डेव्हिड मिलर 24 चेंडूत 26, राहुल तेवातिया 16 चेंडूत नाबाद 22, मॅथ्यू वेड 7 चेंडूत 10. अवांतर 7. अवेश खान 2-26, जेसॉन होल्डर, मोहसिन खान प्रत्येकी 1 बळी).
लखनौ सुपर जायंट्स ः 13.5 षटकात सर्वबाद 82 (दीपक हुडा 26 चेंडूत 27, अवेश खान 12, क्विन्टॉन डी कॉक 10 चेंडूत 11. अवांतर 3. रशिद खान 4-24, रविश्रीनिवासन साई किशोर 2-7, यश दयाल 2-24, शमी 1-5).