आयपीएलमध्ये 7 सामने पूर्ण, 7 सामने बाकी गुजरात, लखनौ, राजस्थानची कामगिरी दमदार
वृत्तसंस्था/ मुंबई
इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) अर्धा टप्पा पार पडला असून सर्व संघांचे निम्मे-निम्मे (7-7) सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे आता प्ले ऑफसाठीची चुरस आणखीन वाढली आहे. या हंगामात एकूण 70 सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी अर्धे म्हणजेच 35 सामने खेळले गेले आहेत. सर्व संघांना साखळी फेरीत प्रत्येकी 14 सामने खेळायचे आहेत. मंगळवारी (दि. 25 एप्रिल) गुजरात वि. मुंबई संघातील सामन्यानंतर प्रत्येक संघाचे प्रत्येकी 7 सामने खेळून झाले आहेत. सध्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ अव्वलस्थानी विराजमान आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघ आणि गतविजेता गुजरात टायटन्स संघ आतापर्यंत शानदार कामगिरी करत पुढे आले आहेत. गुणतालिकेत दोघांनीही प्रत्येकी 7 सामने खेळून 5 विजयांसह 10 गुण मिळवले आहेत. मात्र, नेट रनरेट सरस असल्यामुळे चेन्नईचा संघ अव्वलस्थानी असून गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघांनी 8 गुणासह तिसरे व चौथे स्थान कायम राखले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर पाचव्या आणि पंजाब सहाव्या स्थानी आहे.
दुसरीकडे, पाच वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला मंगळवारी चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. सध्या गुणतालिकेत ते 7 पैकी 3 विजयासह 6 गुण मिळवत सातव्या स्थानी आहेत.
दिल्ली, हैदराबादची वाट खडतर
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ हंगामात खूपच खराब फॉर्ममध्ये आहेत. दिल्ली 10 व्या, तर हैदराबाद 9 व्या स्थानी आहे. दिल्लीला सुरुवातीच्या पाच पराभवानंतर 2 सामन्यात विजय मिळवता आला, पण मजबूत मानल्या जात असलेल्या हैदराबाद संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाहीये. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे हालदेखील दिल्ली आणि हैदराबादसारखीच आहे. केकेआरचा संघ 4 गुणांसह आठव्या स्थानी आहे.
प्लेऑफचे समीकरण
चेन्नई आणि गुजरात हे सध्या अव्वल दोन संघ असून त्यांचे 10-10 गुण आहेत. म्हणजे त्यांनी पुढील 7 पैकी 3 किंवा 4 सामने जिंकले तर 16 किंवा 18 गुणांसह ते प्लेऑफचे तिकीट मिळवू शकतात. याप्रमाणे तिसऱ्या क्रमांकापासून सहाव्या क्रमांकापर्यंतच्या संघांना किमान 4 किंवा 5 सामने जिंकावे लागतील. येथेही प्रश्न रनरेटचा असल्याने अधिकाधिक सामने जिंकून विजयाचे अंतर कसे कमी करता येईल हे जास्त महत्त्वाचे असणार आहे. अर्थात, मुंबई इंडियन्स संघाला हे गणित लागू होते. पहिल्या सात पैकी तीन सामने जिंकल्यानंतर उर्वरित सात पैकी किमान पाच सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. यानंतर ते प्ले ऑफसाठी पात्र ठरु शकतील.
मात्र, सध्याची परिस्थिती पाहिली, तर कोलकाता, हैदराबाद आणि दिल्लीची स्थिती खूपच खराब दिसत आहे. नेहमी आयपीएल प्ले-ऑफमध्ये तेच संघ जातात, जे कमीत कमी अर्धे म्हणजेच, यावेळच्या नियमानुसार 7 सामने जिंकतात. मात्र, या तिन्ही संघांनी पहिल्या 7 सामन्यांपैकी 5 सामन्यात पराभव पत्कारले आहेत. त्यामुळे हे समीकरण पूर्ण करण्यासाठी या तिन्ही संघांना उरलेल्या 7 सामन्यांपैकी कमीत कमी 5 सामने जिंकावे लागतील. आता हे संघ कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आयपीएल पूर्वार्धात डु प्लेसिस, अजिंक्य रहाणेची कामगिरी दमदार
आयपीएलच्या पूर्वार्धात सर्वाधिक धावांचा विक्रम आरसीबीचा कर्णधार डू प्लेसिसने केल्या आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 405 धावा कुटल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. वॉर्नने चालू हंगामात आतापर्यंत एकूण 306 धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक शतकांचा विचार केला, तर वेंकटेश अय्यर आणि हॅरी ब्रुक यांची नावे आहेत. या दोघांनीही चालू हंगामात प्रत्येकी एक-एक शतक केले आहे. शिखर धवनने हंगामातील पूर्वार्धात 77.6 धावांची सर्वोत्तम सरासरीने राखली आहे. तर सीएसकेसाठी खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने 199.04 च्या सर्वोत्तम स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. हंगामात सर्वाधिक चौकार वॉर्नरच्या (44), तर सर्वाधिक षटकार फाफ डू प्लेसिस (25) याच्या नावावर आहे.
आयपीएलच्या पूर्वार्धात सर्वोत्तम प्रदर्शन करणारे खेळाडू
सर्वाधिक धावा – डू प्लेसिस (405 धावा)
सर्वाधिक बळी – रशीद खान (14 बळी)
सर्वाधिक अर्धशतके – फाफ डू प्लेसिस (5)
सर्वाधिक शतके- वेंकटेश अय्यर / हॅरी ब्रुक (प्रत्येकी एक-एक)
सर्वोत्तम स्ट्राईक रेट – अजिंक्य रहाणे (199.04)
सर्वाधिक चौकार – डेविड वॉर्नर (44)
सर्वोत्तम षटकार – डू प्लेसिस (25)