14 भाविकांना कारने चिरडले ः 7 जणांचा मृत्यू ः 6 जणांची प्रकृती गंभीर
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातच्या अंबाजीमध्ये शुक्रवारी सकाळी रस्ते दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. एका भरधाव कारने अंबाजी मातेचे दर्शन करण्यासाठी पायी जात असलेल्या 14 भाविकांना चिरडले. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना मोडासाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत आणि जखमी हे पंचमहाल जिल्हय़ातील रहिवासी होते.

कार अत्यंत वेगाने येत होती. याचदरम्यान कार अनियंत्रित होत भाविकांच्या गर्दीत पोहोचली. 14 जणांना चिरडल्यावर ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली होती. कार खांबाला धडकली नसती तर अजून 10-12 जण कारखाली चिरडले गेले असते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
सलग 20 तास ड्रायव्हिंग
दुर्घटनेत 7 जणांचा जीव घेणाऱया इनोव्हा कारचा चालक 20 तासांपासून सातत्याने ड्रायव्हिंग करत होता. तो पुण्याहून उदयपूरच्या दिशेने जात होता. चालकाची चूक भीषण दुर्घटनेस कारणीभूत ठरली आहे.
आर्थिक मदत
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. अरावली जिल्हय़ात मालपूरनजीक अंबाजी दर्शनासाठी पायी जाणाऱया भाविकांना दुर्घटनेला सामोरे जावे लागले आहे. दुघटनेत जीव गमाविणाऱया भाविकांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबाला 4 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करणार असल्याचे पटेल यांनी ट्विट करत म्हटले आहे.