प्रतिनिधी,कोल्हापूर
राजाराम महाविद्यालयातील ऑक्सिजन पार्कमध्ये दोन दिवसापूर्वी लागलेल्या आगीत शेकडो झाडे भस्मसात झाली.अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी शर्थीचे प्रयत्न करून आगी विझवली,पण तो पर्यंत शेकडो झाडे जळून खाक झाली होती.गेल्या वर्षीही आगीचा असाच प्रकार घडला होता. कुणीतरी खोडसाळपणे आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे.
राजाराम महाविद्यालयाच्या आजी, माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत महाविद्यालयाच्या विस्तीर्ण जागे विविध प्रकारची झाडे लावून ऑक्सिजन पार्क उभारला आहे. या ठिकाणी सकाळी, संध्याकाळी नागरिक फिरण्यासाठी येत असतात. शुक्रवारी सायंकाळी ऑक्सिजन पार्कला अचानक आग लागली. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तो पर्यत शेकडो झाडे जळून गेली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगी विझवली, त्यामुळे आग पसरू शकली नाही. त्यांना हॉस्टेलच्या मुलांनीही मदत केली. दरम्यान, कुणीतरी अज्ञाताने आग लावण्याचा प्रकार केला असावा, असे अंदाज महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व्यक्त केला. याआधी गेल्या वर्षीही याच ठिकाणी आग लागली होती. कुणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणे आग लावत असल्याचा संशय माजी राजारामीयन्सनी व्यक्त केला.
महाविद्यालयाची सुरक्षा धोक्यात
राजाराम महाविद्यालय शासकीय आहे. या ठिकाणी विविध पदे रिक्त आहेत. शिपाई, सुरक्षा रक्षक कंत्राटी पद्धतीने भरा असे शासन सांगते. पण पदे भरल्यास त्यांच्या पगारासाठी निधी देण्यास शासन टाळाटाळ करते. त्याचा फटका महाविद्यालयाला बसत आहे. अपुरे सुरक्षारक्षक असल्याने महाविद्यालयाची सुरक्षाही धोक्यात आली आहे. त्यामुळे याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी माजी राजारामीयन्सकडून होत आहे.
Previous ArticleSatyajit Tambe सत्यजीत तांबेंसाठी भाजपची जोरदार नाशिकमध्ये फिल्डींग; एका उमेदवाराची माघार
Next Article G-20 परिषदेतून शहरातील लोकप्रतिनिधींना डावलणे खेदजनक
Related Posts
Add A Comment