ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या पथकाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी छापा टाकला आहे. मागील अडीच तासांपासून राऊत दाम्पत्याची ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, ही चौकशी सुरू असतानाच राऊत यांनी ट्विटचा धडाका लावला आहे. खोटे प्रकरण आणि खोटी कारवाई सुरू असून, मरेन पण शरण जाणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “खोटी कारवाई.. खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र.”
त्यानंतरच्या दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “कोणत्याही घोटाळय़ाशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे.. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.”
त्यापूर्वीच्या ट्विटमध्ये त्यांनी “महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहिल,” असे म्हटले होते.
1034 कोटींहून अधिक रकमेच्या पत्राचाळ जमीन घोटाळय़ाप्रकरणी मागील तीन तासांपासून 10 अधिकाऱयांचं पथक राऊत दाम्पत्याची चौकशी करत आहे. राऊत यांच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांचा पहारा असून, कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे.
हेही वाचा : संजय राऊतांच्या घरी ईडीचा छापा, 3 पथकांकडून तपास सुरू