बेळगाव / प्रतिनिधी : गणेशोत्सवाची धामधूम संपताच वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. गणेशोत्सवाप्रमाणेच बेळगावमध्ये मोठ्या जल्लोशात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. यासाठी दुर्गादेवीच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. घटस्थापनेसाठी अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने तयारीला वेग आला आहे.
यावर्षी 26 सप्टेंबर दिवशी घटस्थापना असून, 5 ऑक्टोबर रोजी दसरा होणार आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या निर्बंधांमुळे साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा झाला. परंतु यावर्षी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. दुर्गामाता दौड, रास दांडीया महोत्सव, दुर्गादेवीचे पूजन, देवीच्या मंदिरांमध्ये विशेष पूजा होणार आहेत. यासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी दुर्गादेवींच्या मूर्तीचे पूजन केले जाते. केवळ स्थानिक नागरिकचं नाही तर बंगाली लोकांकडूनही दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.