रेल्वेमंत्रालयाची नवीन नियमावली : सहापट दंडाची होणार आकारणी
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वेप्रवास करताना मर्यादेपेक्षा अधिक साहित्य घेऊन जाणाऱया प्रवाशांना यापुढे दंड भरावा लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाने नवीन नियमावली जाहीर केली असून त्याद्वारे किती किलो साहित्य प्रवाशांजवळ असावे, हे जाहीर केले आहे. प्रत्येक बोगीनुसार 35 ते 70 किलो मर्यादा ठरविण्यात आली असून यापुढे रेल्वेने प्रवास करताना सोबत असणाऱया साहित्याचे वजन करावे लागणार आहे.
ज्याप्रकारे विमान प्रवास करताना सोबत असणाऱया साहित्यावर मर्यादा होत्या, त्याच पद्धतीने आता रेल्वेतून प्रवास करतानाही प्रवाशांना मोजकेच साहित्य मोफत घेऊन जाता येणार आहे. उर्वरित साहित्यासाठी रितसर लगेज चार्जेस भरावे लागणार आहे. यापूर्वी प्रवासी आपल्या सोबत हवे तितके साहित्य घेऊन जात होते. त्यामुळे रेल्वेत प्रवासी एक तर बॅगा चार अशी परिस्थिती असायची. यामुळे इतर प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता.
रेल्वेच्या नव्या नियमावलीनुसार 35 ते 70 किलो साहित्य घेऊन जाता येणार आहे. एका प्रवाशासोबत मर्यादित साहित्य असणे आवश्यक आहे. एखाद्या प्रवाशाकडे जर अधिक साहित्य असेल तर त्यांना रेल्वेस्थानकावर असणाऱया लगेज डिपार्टमेंटमध्ये संपर्क साधायचा आहे. प्रवासाला जाण्यापूर्वी काही तास अगोदर प्रवाशांना हे बुकिंग करावे लागणार आहे. यामुळे अवास्तव साहित्याची होणारी ने-आण काही प्रमाणात कमी होणार आहे.
30 रुपयांपासून पुढे दंड
मर्यादेपेक्षा अधिक साहित्य घेऊन प्रवास करणाऱयांना सहापट अधिक दंडाची आकारणी होऊ शकते. त्यामुळे रेल्वेने ठरवून दिलेल्या प्रमाणातच प्रवाशांना साहित्य घेऊन जाता येणार आहे. कमीत कमी 30 रुपयांपासून पुढे दंड असणार आहे.
कोच | साहित्याची मर्यादा (किलोमध्ये) |
एसी फर्स्ट क्लास | 70 किलो |
एसी सेकंड क्लास | 50 किलो |
एसी थर्ड क्लास | 40 किलो |
स्लीपर क्लास | 40 किलो |
सेकंड क्लास | 35 किलो |