कुणाचीच मदत नको ः पाश्चिमात्य शक्तींकडून युक्रेनचा वापर
वृत्तसंस्था / मॉस्को
रशिया-युक्रेन युद्धाला 24 फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यापूर्वीच रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी देशवासीयांना संबोधित केले आहे. रशियाने प्रारंभी युद्ध टाळण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले, परंतु नाटो आणि अमेरिकेने हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. आम्ही अजूनही चर्चा करू इच्छितो, परंतु याकरता कुठल्याही अटी मान्य करणार नाही. आमचे युद्ध युक्रेनच्या लोकांशी नाही. रशियाला युद्धाच्या मैदानात हरविणे अशक्य आहे. युरोपमध्ये पोलिसाची भूमिका साकारण्याची महत्त्वाकांक्षा पाश्चिमात्य शक्ती बाळगून आहेत. परंतु आम्ही आमच्या मुलांवर कुठलाच धोका येऊ देणार नसल्याचे पुतीन म्हणाले.
युक्रेनला दीर्घ पल्ल्याची सुरक्षा यंत्रणा दिली जात असून यामुळे आमच्या सीमेवर धोका निर्माण झाला आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान स्थानिक वाद होता, अमेरिका आणि त्याच्या सहकाऱयांनी त्याला जागतिक स्वरुप दिले आहे. या युद्धाची सुरुवात पाश्चिमात्य शक्तींमुळे झाली हेच सत्य आहे. पाश्चिमात्य शक्ती कीव्ह आणि युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत. परंतु आम्ही आमच्या देशाचे रक्षण करण्यास सक्षम आहोत असे पुतीन म्हणाले.
अमेरिका आणि त्याचे सहकारी केवळ स्वतःचा दबदबा वाढविण्याच्या कटासाठी इतरांचा प्यादी म्हणून वापर करत आहेत. पाश्चिमात्य शक्तींनीच हे युद्ध लादले असून तेच थांबवू शकतात. आम्ही केवळ आमचा देश आणि लोकांचे रक्षण करू इच्छित असल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे.
डोनबासचा मुद्दा
डोनबास मुद्दा आम्ही शांततेने सोडवू असे पूर्वीच स्पष्ट केले आहे. परंतु पाश्चिमात्य शक्तींनी रशियावर नाहक आरोप केले आहेत. पाश्चिमात्य शक्ती रशियाचा सन्मान करत नाहीत. पाश्चिमात्यांच्या कृत्यांमुळेच आम्हाला युक्रेनवर आक्रमण करावे लागले. डोनबासच्या लोकांनी रशियन सरकारकडे मदत मागितली होती. पाश्चिमात्य देशांनी यूगोस्लोवाकिया, इराक, लीबिया आणि सीरियाला यापूर्वी उद्ध्वस्त केले आहे. याचीच पुनरावृत्ती ते युक्रेनसोबत करू इच्छित असल्याचा आरोप पुतीन यांनी केला आहे. रशिया स्वतःच्या सन्मानाबद्दल कधीच तडजोडर करणार नाही. डोनबासचा मुद्दा निकाली काढण्याइतकी शक्ती कीव्हमध्ये नाही. डोनबासचे लोक रशियात सामील होऊ इच्छितात. युद्धामुळेच या प्रकरणी तोडगा निघेल असे मी कधीच म्हटलेले नाही. चर्चा व्हायला हवी, परंतु याकरता योग्य पद्धत अवलंबिण्यात यावी. दबावतंत्रासमोर रशिया मान झुकविणार नसल्याचे पुतीन म्हणाले.
अमेरिकेकडून दुर्लक्षित
पाश्चिमात्य शक्तीशी वाटाघाटी करण्यास आम्हाला कुठलीच अडचण नाही. संयुक्त सुरक्षा संरचना असावी अशी आमची इच्छा आहे. याकरता मी स्वतः अनेक वर्षांपर्यंत प्रयत्न केले, परंतु अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य शक्तींची तोडगा निघावा अशी इच्छा नाही. त्यांनी नेहमीच रशियाला दुर्लक्षित केले आहे. पाश्चिमात्य शक्ती अध्यात्मिक नाशाच्या दिशेने जात आहेत. त्यांच्याकडून आमच्या चर्च आणि परंपरांवर हल्ले केले जात असल्याचा दावा पुतीन यांनी केला.
आण्विक करार संपुष्टात
पुतीन यांनी स्वतःच्या भाषणाच्या अखेरीस महत्त्चाची घोषणा केली आहे. रशिया अण्वस्त्रांसंबंधी अमेरिकेसोबत करण्यात आलेल्या स्टार्ट न्यू ट्रीटीचे पालन करणार नसल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. या कराराचा उद्देश दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्रांची संख्या मर्यादित करणे होता. करारात दोन्ही देशांना स्वतःकडे 1550 हून अधिक अण्वस्त्रs आणि 700 हून अधिक स्टॅटेजिक लाँचर न बाळगण्याची तरतूद होती.