ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. दरम्यान, आज पुण्यात शिंदे आणि ठाकरे गटाचे समर्थक समोरासमोर आल्याने जोरदार राडा झाला. यावेळी महिला कार्यकर्त्यांची धरपकड झाली. पुण्यातील गांजवे चौकातील पत्रकार भवनसमोर हा प्रकार घडला.
एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी शिंदे आणि ठाकरे गटाचे समर्थक एकत्र आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या पुण्यातील पदाधिकाऱयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाली. महिला कार्यकर्त्या एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या. त्यावेळी त्यांच्यात धरपकड झाली.
अधिक वाचा : ठाकरेंना आणखी एक धक्का! मशाल चिन्ह आणि पक्षाचे नाव कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंतच…
दरम्यान, परिस्थिती निवळत नसल्याचे पाहून पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना थांबवले. त्यांची समजूत घालून त्यांना तेथून जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.