प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक मराठा समाज विकास निगम कार्यालयाचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण, असा संयुक्त कार्यक्रम बेंगळूर येथील आरमने मैदान, त्रिपूरवासिनी येथे मंगळवार दि. 19 रोजी होणार आहे. सकाळी 11 वाजता हा भव्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कर्नाटक भाजपचे राज्य ओबीसी मोर्चा सचिव आणि सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव यांनी केले आहे.
कर्नाटक राज्य मराठा समाज विकास निगम उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या उपस्थितीत आरमने मैदान येथे होणार आहे. मराठा समाजाचा समावेश 2-बीमध्ये करावा, अशी मागणी मराठा समाजाच्यावतीने केली जात आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी या कार्यक्रमात प्रयत्न केले जाणार असल्याने या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे.