जनावरांना मिळणार विविध सुविधा : लॅब, तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती

प्रतिनिधी /बेळगाव
जनावरांना एकाच छताखाली आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन दि. 15 जुलै रोजी करण्यात येणार आहे. महांतेशनगर येथील हॉस्पिटलच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे.
पशुधनाला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता भव्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी जनावरांना आरोग्याच्या सुविधेबरोबर कृत्रिम गर्भधारणा, रक्ततपासणी, अवघड शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करून तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांच्या जनावरांना बेळगावातच विविध आरोग्यासंबंधी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन लांबणीवर पडले होते. हॉस्पिटलच्या आवारातील रस्ता काम रखडल्यामुळे शुभारंभ लांबणीवर पडला होता. मात्र आता रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात मल्टिस्पेशालिटीचा थाटात उद्घाटन सोहळा होणार आहे.
जिल्हय़ात 28 लाख जनावरे
जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये बैल, गाय, म्हैस, शेळय़ा-मेंढय़ा, कुत्रा, मांजर, डुक्कर, घोडा, गाढव आदींचा समावेश आहे. या जनावरांना वेळेत आणि आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हय़ात 28 लाख जनावरांची संख्या असली तरी त्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. त्यामुळे जनावरांना आरोग्याच्या सुविधा पुरविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिवाय एखादी अवघड आणि मोठी शस्त्रक्रिया करणे देखील अडचणीचे बनले होते. अशा परिस्थितीत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आता आधार ठरणार आहे.
शासनाच्या नियमानुसार पाच हजार जनावरांमागे एक डॉक्टर असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात 10 जनावरांमागेदेखील एक डॉक्टर नाही. अशी बिकट आणि वास्तव परिस्थिती आहे. त्यामुळे पशुपालकांना खासगी डॉक्टरांचाच आधार घ्यावा लागतो. परिणामी आर्थिक भुर्दंडही बसत आहे. या आधी जिल्हय़ात रक्त तपासणी प्रयोग शाळा आणि अवघड शस्त्रक्रिया होत नव्हत्या. मात्र आता या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणीबरोबर शस्त्रक्रियादेखील केल्या जाणार आहेत.
हॉस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रियाही केल्या जाणार
महांतेशनगर येथे उभारण्यात आलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन 15 रोजी केले जाणार आहे. त्यानंतर हॉस्पिटल जनावरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याठिकाणी विविध सुविधा उपलब्ध आहेत. जनावरांच्या आरोग्याच्या तपासणीबरोबर अवघड शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी आता केल्या जाणार आहेत. यासाठी तज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध आहेत.
– डॉ. राजीव कुलेर (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)