प्रभाग 14 मध्ये धूर – औषधफवारणी मोहीम
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रात खास करून शहरी भागात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. मध्यवर्ती प्रभाग 14 मध्ये चिकुनगुनिया तसेच डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने स्थानिक नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर कवळेकर यांनी पालिकेच्या सहकार्याने प्रभागात धूर फवारणी मोहिम हाती घेतली आहे.
प्रभाग 14 मध्ये गांधी मार्केट, सिने लता, स्टेशन रोड, हरी मंदिर परिसरांत तसेच अन्य मध्यवर्ती भागांत फॉगिंग करण्यात आल्याची माहिती डॉ. रोनिता यांनी दिली. आपणाकडे चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पालिका तसेच मडगाव आरोग्य केंद्राकडे संपर्क साधला असता चांगला प्रतिसाद मिळाला. पालिकेकडून धूरफवारणी, तर आरोग्य केंद्राकडून औषधफवारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकांनी आपल्या सभोवतालील जागेत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा यातून डांस पैदास होण्यास मदत होते व डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे संसर्गजन्य आजार बळावतात, याकडे डॉ. रोनिता यांनी लक्ष वेधले. चिकुनगुनियामुळे अंगदुखी तसेच सूज येणे अशी लक्षणे आढळून येत आहेत. याबरोबर भरपूर ताप येत असतो. सध्या मडगावचा शहरी भाग, पाजीफोंड, मालभाट येथे चिकुनगुनिया रुग्ण मोठय़ा प्रमाणात आहेत. कित्येक जण खासगी रुग्णालयांत जाऊन वा घरीच उपचार घेत असल्याने आरोग्य केंद्राच्या आकडेवारीत खरे चित्र दिसून येत नाही, अशी प्रतिक्रिया अन्य एका स्थानिक नगरसेवकाने व्यक्त केली.