गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची हेस्कॉमकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बसवन कुडची गावातील मुख्य रस्त्यावरून विद्युतवाहिन्या गेल्या आहेत. रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे रस्त्यापासून विद्युतवाहिन्यांचे अंतर कमी झाले आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तींची वाहतूक करताना अनेक अडचणी मंडळांसमोर उभ्या ठाकत आहेत. त्यामुळे विद्युतवाहिन्यांची उंची वाढवावी, अशी मागणी बसवन कुडची येथील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांनी बुधवारी हेस्कॉमला निवेदनाद्वारे केली.
गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच जण गणरायाच्या आगमनाची तयारी करीत आहेत. गणेशमूर्ती गावामध्ये आणताना बसवन कुडची येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काँक्रीट रस्त्याची उंची वाढल्याने गणेशमूर्ती आणताना विद्युतवाहिन्या लागत होत्या. यामुळे कर्मचाऱयांना सांगून वीजपुरवठा बंद केला जात होता. यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विद्युतवाहिन्यांची उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत होती.
बुधवारी रेल्वेस्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालयात साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर सिद्धू अंगडी, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मल्लेश मुचंडीकर, गजानन कोळूचे, सुनील निलजकर, शंकर मुचंडीकर, आकाश हिंडलगेकर, किरण बेडका आदी उपस्थित होते.
हेस्कॉमकडून मागणीची दखल गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांनी साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांना निवेदन दिले. त्यांनी याची दखल घेत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. सेक्शन ऑफिसर सिद्धू अंगडी यांना बोलावून विद्युत खांबांना सपोर्ट जोडून उंची वाढवावी, अशी सूचना केली. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.