नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि इस्रायल यांनी एकमेकांशी संरक्षण सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या एका धोरणपत्रावर येथे गुरुवारी स्वाक्षऱया करण्यात आल्या. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गान्झ तसेच भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्यात चर्चा झाल्यानंतर या पत्रकावर स्वाक्षऱया करण्यात आल्या आहेत.
भारत आणि इस्रायल यांच्यात संरक्षण सहकार्य स्थापनेला आता 30 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त हे धोरणपत्र (व्हिजन डॉक्युमेंट) तयार करण्यात आले आहे. भारत आणि इस्रायल यांच्या समोर समान संरक्षणविषयक आव्हाने उभी आहेत. त्यामुळे त्यांना तोंड देण्यासाठी सामायिक संरक्षण धोरण ठरविण्यात आले आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य दृढ झाले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी हे धोरणपत्र तयार करण्यात आले आहे, अशी माहिती इस्रालयाच्या संरक्षण विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात देण्यात आली.
संयुक्त संशोधन आणि विकास
दोन्ही देश संयुक्तरित्या अत्याधुनिक शस्त्रांचे संशोधन आणि विकास करणार आहेत. तसेच संरक्षण साधनांच्या उत्पादनातही त्यांचे एकमेकांशी सहकार्य असेल. भारताची संशोधन संस्था डीआरडीओ आणि इस्रायलची शस्त्रसंशोधन संस्था यांच्यात या संदर्भात काही वर्षांपूर्वी एक करार झाला होता. या कराराच्या प्रगतीवरही दोन्ही संरक्षणमंत्र्यांनी विचारविमर्श केला. इस्रायलचे तंत्रज्ञान आणि शस्त्रनिर्मितीचा अनुभव तसेच भारताचे विशाल उत्पादन सामर्थ्य आणि विकासक्षमता यांचा संगम झाल्यास ही संरक्षण विषयक भागीदारी अधिक प्रबळ होणार आहे. दोन्ही देश त्या दिशेने वाटचाल करीत आहेत, अशी माहिती भारताकडून देण्यात आली.