30 बुद्धिबळपटूंचा समावेश
चेन्नई / वृत्तसंस्था
जागतिक स्तरावरील सर्वात मोठा चेस इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱया यंदाच्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारत 6 संघ उतरवणार असून यात 30 खेळाडूंचा समावेश असेल. या स्पर्धेत 187 देश सहभागी होत असून या 187 देशांचे 188 संघ खुल्या गटात तर 162 संघ महिला गटात खेळतील. भारतीय संघ यात खुल्या गटात 3 व महिला गटात 3 संघ उतरवेल. ही स्पर्धा दि. 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाणार आहे.
भारताच्या 6 संघात प्रत्येकी 5 बुद्धिबळपटूंचा समावेश असेल आणि यातील 4 खेळाडूंना प्रत्येक फेरीत उतरवले जाणार आहे. बहुतांशी वेळी संघाचा कर्णधार बहिस्थ असेल आणि तोच संघातील खेळाडूंची क्रमवारी निश्चित करेल. ऑलिम्पियाड 11 राऊंड स्विस लीग पद्धतीने खेळवली जाणार असून खुल्या गटातील भारताच्या 3 संघांना अनुक्रमे दुसरे, अकरावे व 17 वे मानांकन देण्यात आले आहे. भारताच्या द्वितीय मानांकित पहिल्या संघात विदित गुजराती, पी. हरिकृष्णा, अर्जुन इर्गेसी, एसएल नारायण व शशिकिरण कृष्णन यांचा समावेश आहे.