वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरियातील देगू येथे सुरू असलेल्या 15 व्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत सांघिक प्रकारात भारतीय नेमबाजांनी सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी आपले निर्विवाद वर्चस्व राखताना एकूण 10 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. सांघिक प्रकारातील चारही सुवर्णपदके भारताला मिळाली आहेत.
पुरुषांच्या सांघिक एअर रायफल 10 मी. नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अर्जुन बेबुटा, किरण अंकुश जाधव आणि रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी कजाकस्तानचा 17-11 असा पराभव करत महिलांच्या सांघिक 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या मेहुली घोष, इलाव्हेनील व्हॅलवेरियन आणि मेघना सजनार यांनी सुवर्णपदक मिळवताना यजमान कोरियाचा 16-10 अशा गुण फरकाने पराभव केला. या स्पर्धेत कनिष्ठ पुरुषांच्या सांघिक 10 मी. एअर रायफल नेमबाजीच्या अंतिम लढतीत भारताच्या पनवार, श्रीकार्तिक, शबरीराज रवीशंकर आणि विदित जैन यांनी यजमान कोरियाचा 16-10 असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. कनिष्ठ महिलांच्या सांघिक 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या नॅन्सी, रमिता आणि तिलोत्तमा सेन यांनी यजमान कोरियन संघाचा 16-2 असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. भारताने सांघिक प्रकारातील चारही सुवर्णपदके मिळवून आपले निर्विवाद वर्चस्व राखले.
शनिवारी भारताच्या शिरीष काश्यप, पार्थ माने आणि अभिनव शॉ यांनी पुरुषांच्या सांघिक युवा 10 मी. एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक मिळवताना यजमान कोरियाचा 16-8 असा फडशा पाडला. त्यानंतर महिलांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक युवा विभागात भारताच्या गौतमी भानोत, हॅजेल आणि युक्ती राजेंद्र यांनी कोरियाचा 16-6 असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेमध्ये भारताचे नेमबाज पनवार, मेहुली घोष आणि तिलोत्तमा सेन यांनी प्रत्य़ेकी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.