ईशान किसन, हुडा यांच्या कामगिरीवर लक्ष, न्यूझीलंड सलग दुसऱया विजयासाठी इच्छुक
वृत्तसंस्था/ लखनौ
यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत रविवारी येथे दुसरा सामना खेळविला जाणार आहे. या मालिकेतील रांचीत झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 21 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली असल्याने भारतीय संघाला या मालिकेतील आपले अस्तित्व राखण्यासाठी विजय मिळविणे आवश्यक आहे.
या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या रांचीतील पहिल्या सामन्यात खेळपट्टी फिरकी आणि उसळत्या गोलंदाजीला साथ देत होती. याबद्दल कर्णधार हार्दिक पांडय़ाने आश्चर्य व्यक्त केले आहे. या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज सँटेनरने दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. या पहिल्या सामन्यात सँटेनरने आपल्या 4 षटकांमध्ये 11 धावात 2 गडी बाद केले. मिचेल सँटेनर हा टी-20 प्रकारातील न्यूझीलंडचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज असल्याचे मत कर्णधार डॅरेल मिचेलने व्यक्त केले आहे.
या मालिकेतील पहिला सामना गमावल्याने भारतीय संघाला फलंदाजी तसेच गोलंदाजीतही रविवारच्या सामन्यात अधिक दर्जेदार कामगिरी करावी लागेल. अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक या वेगवान गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करणे जरुरीचे आहे. पहिल्या सामन्यात मलिकने आपल्या एका षटकात 16 धावा दिल्या होत्या तर न्यूझीलंडच्या डावातील शेवटच्या षटकात अर्शदीपने 27 धावा दिल्याने भारताला हा सामना गमवावा लागला. धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांवर दुसऱया डावात खेळताना थोडे दडपण येत असल्याचे जाणवते. भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना डावाला दणकेबाज सुरुवात करता आली नाही. कर्णधार हार्दिक पांडय़ा रविवारच्या दुसऱया सामन्यासाठी नवोदित मुकेश कुमारला संधी देईल, असे वाटत नाही. दरम्यान, अर्शदीपला तो या सामन्यासाठी योग्य सल्ला देण्याचा विचार करीत आहे. भारतीय संघातील फलंदाज ईशान किसन आणि दीपक हुडा यांना आक्रमक फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. शुभमन गिल सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे जाणवते. वनडे प्रकारात त्याची फलंदाजी बहरली असली तरी त्याने टी-20 चे केवळ चार सामने खेळले आहेत. ईशान किसन वनडे आणि टी-20 या प्रकारातील गेल्या सात डावांमध्ये अधिक धावा जमवू शकला नाही. गेल्या जून महिन्यात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात त्याने एकमेव अर्धशतक झळकविले होते. खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणारा हुडा यालाही गेल्या 13 डावांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नसल्याचे दिसून येते. न्यूझीलंडविरुद्धच्या शुक्रवारच्या सामन्यात हुडाने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 10 चेंडूत 10 धावा जमविल्या. पण त्याला स्ट्राईक रोटेट करता आला नाही. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची पहिल्या सामन्यातील कामगिरी निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल. त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 28 चेंडूत 50 धावा जमविल्या तर गोलंदाजीत त्याने 2 बळी मिळविले. आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याकडून लखनौच्या खेळपट्टीवर फटकेबाजीची अपेक्षा बाळगली जात आहे.
मिचेल सँटेनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने टी-20 मालिकेत पहिला सामना जिंकून भारतावर आघाडी मिळविली असल्याने रविवारच्या दुसऱया सामन्यात भारताच्या तुलनेत त्यांच्यावर अधिक दडपण राहणार नाही. न्यूझीलंडचा संघ लखनौचा सामना जिंकून मालिका काबीज करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताच्या दौऱयावर आलेल्या न्यूझीलंड संघाला यापूर्वी वनडे मालिकेत एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंड संघातील कॉनवे आणि मिचेल हे चांगल्याच फॉर्ममध्ये असून भारतीय गोलंदाजीची या सामन्यात सत्वपरीक्षा ठरेल.
संभाव्य संघ- भारत- हार्दिक पांडय़ा (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किसन, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.
न्यूझीलंड संघ- मिचेल सँटेनर (कर्णधार), ऍलेन, कॉनवे, फिलिप्स, क्लेव्हर, चॅपमन, ब्रेसवेल, मिचेल, रिपॉन, फर्ग्युसन, सोधी, टिकनेर, डफी, शिप्ले आणि लिस्टर.
सामन्याची वेळ- सायंकाळी 7 वा.