प्रथमच दोन पुरस्कार ः ‘नाटू नाटू’ गाण्यासह ‘द एलिफंट विस्परर्स’ लघुपटाने मारली बाजी
वृत्तसंस्था/ लॉस एंजेलिस
‘ऑस्कर 2023’मध्ये भारताने इतिहास रचत प्रथमच दोन पुरस्कार प्राप्त केले. तब्बल 21 वर्षानंतर 95 व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. भारतीय सिनेसृष्टीने अभिमानास्पद कामगिरी करत ‘द एलिफंट विस्परर्स’ने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावला आहे. तर दुसरीकडे राजामौलींच्या बहुचर्चित ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ‘बेस्ट ओरिजनल साँग’ या श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. भारताने दोन पुरस्कार प्राप्त केल्याने देशातील सिनेशौकिनांच्या आनंदाला उधाण आले आहे.
‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो. भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी साडेपाच वाजता अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू झाला. या सोहळय़ात ‘आरआरआर’मधील ‘नाटू-नाटू’ गाणे लिहिणारे चंद्रबोस आणि संगीतकार एमएम कीरवानी यांनी ट्रॉफी स्वीकारली. यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौलीही उपस्थित होते. द एलिफंट व्हिस्पर्सच्या दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस आणि निर्माते गुनीत मोंगा यांना सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. यावेळी सोहळय़ात उपस्थित दीपिका पदुकोण भावूक झाली. त्या सोहळय़ाची निवेदिका म्हणून ती सहभागी झाली होती.
भारताच्या ‘नाटू-नाटू’ची धूम
ऑस्कर पुरस्कार सोहळय़ात भारताच्या ‘नाटू-नाटू’ या बहुचर्चित गाण्याची धूम पाहायला मिळाली. या पुरस्कार सोहळय़ात काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी याचे गायन केले. त्यांच्या गायनाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. या गाण्यासाठी त्यांना ‘स्टँडिंग ओव्हेशन’देखील मिळाले.
ऑस्कर विजेत्यांचे पंतप्रधानांकडून कौतुक
जगभरातून ऑस्कर विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत आरआरआर आणि द एलिफंट विस्परर्स या टीम्सचे कौतुक केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘नाटू नाटू’ची लोकप्रियता जागतिक असून ती पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील असे म्हटले आहे. तर दुसऱया ट्विटमध्ये नरेंद्र मोदींनी ‘द एलिफंट विस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीच्या टीमचे अभिनंदन केले.
तमाम भारतीयांची अपेक्षापूर्ती
95 व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत असल्यामुळे कोटय़वधी भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या. एस. एस. राजामौली यांचा चित्रपट ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ गाण्याने नामांकन मिळविल्यामुळे त्याच्याकडून बऱयाच अपेक्षा होत्या. या गाण्याला पुरस्कार मिळाल्याने तमाम भारतीयांची अपेक्षापूर्ती झाली आहे. एम. एम. कीरावानी यांनी ‘नाटू नाटू’ गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या गीताला ऑस्करसाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्समध्ये पार पडलेल्या नामांकन सोहळय़ात या गाण्याने लेडी गागा आणि री-री यांच्या गाण्यांनाही मागे टाकले होते. दिग्दर्शक गुनीत मोगींचा द एलिफंट विस्परर्स हा लघुबोधपटाला देखील नामांकन मिळाले होते.
दीपिका पदुकोण निवेदिकेच्या भूमिकेत
बॉलिवूडची ‘मस्तानी’, ‘डिंपल गर्ल’ अर्थात दीपिका पदुकोणचा ‘ऑस्कर 2023’च्या सोहळय़ात निवेदिका किंवा प्रेझेंटरच्या यादीत समावेश होता. ऑस्कर पुरस्कार सोहळय़ातील दीपिकाच्या क्लासी लुकने सर्वांचे लक्ष वेधले होते. अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱया दीपिकाने ऑस्करमध्येदेखील भारताचे नाव उंचावले आहे.
‘आरआरआर’ला विदेशात मोठी लोकप्रियता
‘आरआरआर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरण्यासह समीक्षकांनीही याचे कौतुक केले होते. या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण, आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने 1200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. या चित्रपटाला विदेशातही मोठी लोकप्रियता लाभली आहे. अमेरिका आणि जपानमध्ये या चित्रपटाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.