तिसऱया सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी मात, रोहित शर्मा, मालिकावीर
वृत्तसंस्था/ इंदोर
कर्णधार रोहित शर्मा व मालिकावीर शुबमन गिल या दोन्ही सलामीवीरांनी नोंदवलेली शतके व उपकर्णधार हार्दिक पंडय़ाचे अर्धशतक तसेच सामनावीर शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, चहल यांच्या भेदक माऱयाच्या बळावर भारताने तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा एकंदर तिसऱयांदा एकतर्फी विजय मिळविला. या विजयासह भारताने वनडे संघांच्या क्रमवारीत पहिले स्थानही मिळविले आहे. आता शुक्रवारी या दोन संघांतील पहिला टी-20 सामना रांची येथे होणार आहे.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने धावांचा डोंगर उभा करताना निर्धारित 50 षटकांत 9 बाद 385 धावा फटकावल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 41.2 षटकांत 295 धावांत गुंडाळून शानदार विजय साकार केला. न्यूझीलंडच्या डावात कॉनवेने झुंजार शतक नोंदवत निकोल्ससमवेत दुसऱया गडय़ासाठी शतकी भागीदारी नोंदवली तेव्हा न्यूझीलंडच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण ही जोडी फुटल्यानंतर इतर फलंदाजांना मोठे योगदान देता आले नाही. ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि 42 व्या षटकात त्यांचा डाव 295 धावांत आटोपला. एकाकी झुंज देणाऱया कॉनवेने 100 चेंडूत 12 चौकार, 8 षटकारांसह 138, निकोल्सने 40 चेंडूत 42, मिचेलने 24, मायकेल ब्रेसवेलने 22 चेंडूत 26, सँटनरने 29 चेंडूत 34 धावा केल्या. शार्दुल ठाकुरने 45 धावांत 3 तर कुलदीप यादवने 62 धावांत 3 आणि यजुवेंद्र चहलने 2 व हार्दिकने एक बळी मिळविला.

भारताची दणकेबाज सुरुवात
न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने दमदार सुरुवात करताना पहिल्या गडय़ासाठी द्विशतकी (212) भागीदारी केली. गिल व रोहित यांनी प्रारंभापासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमक हल्ला करीत त्यांची यथेच्छ धुलाई केली. फर्ग्युसनने टाकलेल्या आठव्या षटकात गिलने 22 धावा फटकावल्या, त्यात एक चौकार, एका षटकाराचा समावेश होता. 7.4 षटकांत या दोघांनी संघाला अर्धशतकी मजल मारून दिली आणि पॉवरप्लेच्या दहा षटकाअखेर भारताने बिनबाद 82 धावा जमविल्या होत्या. यावेळी रोहित 39 व गिल 41 धावांवर खेळत होते. गिलने सँटनरला चौकार मारत अर्धशतक 33 चेंडूत पूर्ण केले तर रोहितने सँटनरला उत्तुंग षटकार मारत अर्धशतक 41 चेंडूत गाठले.

फटकेबाजीचा ओघ कायम राखत या दोघांनी 12.4 षटकांत संघाचे शतक फलकावर लावले. त्यानंतर 150 धावांचा टप्पा 17.5 षटकांत तर 24.1 षटकांत दोनशेचा टप्पा गाठला. रोहित उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसून आला. त्याने 30 वे वनडे शतक 83 चेंडूत पूर्ण केले. जानेवारी 2020 नंतर त्याने वनडेत नोंदवलेले हे पहिलेच शतक आहे. नंतर गिलनेही आपले चौथे वनडे शतक ब्लेअरला चौकार ठोकत 72 चेंडूत पूर्ण केले. मायकेल ब्रेसवेलने न्यूझीलंडने पहिले यश मिळवून देताना रोहितला त्रिफळाचीत केले. त्याने 85 चेंडूत 101 धावा फटकावले, त्यात 9 चौकार, 6 षटकारांचा समावेश होता. पुढच्याच षटकात टिकनरने गिलला झेलबाद केले. त्याने 78 चेंडूत 13 चौकार, 5 षटकारांच्या मदतीने 112 धावा झोडपल्या.
कोहली व इशान किशन या नव्या जोडीनेही आक्रमण पुढे चालूच ठेवले आणि 32 षटकांत संघाला 250 धावांचा टप्पा गाठून दिला. या दोघांतील 38 धावांची भागीदारी इशान किशन धावचीत झाल्यानंतर संपुष्टात आली. त्याने 24 चेंडूत 17 धावा काढल्या. कोहलीच्या साथीला सूर्यकुमार यादव आला. पण यावेळीही त्याच्याकडून निराशा झाली. स्थिरावत असणारा कोहली 27 चेंडूत 36 धावा काढून बाद झाला तर डफीने आपला दुसरी बळी मिळविताना सूर्यकुमारला लाँगऑनवर कॉनवेमार्फत झेलबाद केले. त्याने 9 चेंडूत 2 षटकारांसह 14 धावा केल्या. 293 धावसंख्येवर भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता.
41 व्या षटकात भारताने तीनशे धावांचा टप्पा पार केला. टिकनरने दुसरा बळी मिळविताना वॉशिंग्टन सुंदरला 9 धावांवर बाद केले. हार्दिक पंडय़ा व शार्दुल ठाकुर यांनी पडझड रोखताना जलद धावा जमवित 54 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. स्कूपचा फटका मारताना शार्दुल यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाला. शार्दुलने 17 चेंडूत 25 धावा फटकावताना 3 चौकार, एक षटकार मारला. हार्दिकने आक्रमण पुढे चालू ठेवले आणि त्याने नववे अर्धशतक 36 चेंडूत गाठले. त्यात 2 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. 38 चेंडूत 54 धावा काढून तो बाद झाला आणि भारताने 50 षटकाअखेर 9 बाद 385 धावा जमवित न्यूझीलंडसमोर कठीण आव्हान ठेवले. न्यूझीलंडच्या डफी व टिकनर यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविले. मायकेल ब्रेसवेलने एक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक ः भारत 50 षटकांत 9 बाद 385 ः रोहित शर्मा 101 (85 चेंडूत 9 चौकार 6 षटकार), गिल 112 (78 चेंडूत 13 चौकार, 5 षटकार), कोहली 36 (27 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), इशान किशन 17 (24 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), सूर्यकुमार 14 (9 चेंडूत 2 षटकार), हार्दिक पंडय़ा 54 (38 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), सुंदर 9, शार्दुल 25 (17 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), कुलदीप यादव 3, उमरान नाबाद 2, अवांतर 12. गोलंदाजी ः डफी 3-100, टिकनर 3-76, मायकेल ब्रेसवेल 1-51.
न्यूझीलंड 41.3 षटकांत सर्व बाद 295 ः कॉनवे 138 (100 चेंडूत 12 चौकार, 8 षटकार), हेन्री निकोल्स 42 (40 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), डॅरील मिचेल 24 (31 चेंडूत 2 चौकार), ब्रेसवेल 26 (22 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), सँटनर 34 (29 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), अवांतर 19. गोलंदाजी ः शार्दुल 3-45, कुलदीप 3-62, चहल 2-43, उमरान मलिक 1-52, हार्दिक पंडय़ा 1-37.
गिलच्या 2000 आंतरराष्ट्रीय धावा आणि मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम
सलामीवीर शुबमन गिलने या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 2000 धावांचा टप्पा पार केला. त्याने 143.58 च्या स्ट्राईकरेटने 112 धावा फटकावल्या. त्याने एकूण 37 सामन्यांतील 49 डावांत 2048 धावा 47.62 च्या सरासरीने जमविल्या आहेत. त्यात 5 शतके, 9 अर्धशतकांचा समावेश आहे. 208 ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. कसोटीमध्ये त्याने 13 सामन्यांतील 25 डावांत 32 च्या सरासरीने 736 धावा जमविल्या. त्यात 1 शतक व 4 अर्धशतके आहेत. याशिवाय 21 वनडेमध्ये 21 डावांत त्याने 1254 धावा 73.76 च्या भक्कम सरासरीने जमविल्या आहेत. 4 शतके व 5 अर्धशतकांचा त्यात समावेश असून 208 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच तो 3 टी-20 सामन्यात खेळला असून त्यात 58 धावा जमविल्या. 46 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 360 धावा तब्बल 180 च्या सरासरीने जमवित विक्रम नेंदवला आहे. यापूर्वी कोहलीने लंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक 283 धावा जमविण्याचा विक्रम केला होता. गिलप्रमाणे पाकच्या बाबर आझमनेही एका मालिकेत 360 धावा जमविल्या आहेत. 2016 मध्ये विंडीजविरुद्ध त्याने हा विक्रम केला होता.
सर्वाधिक षटकार नोंदवणाऱयांत रोहित शर्मा तिसरा आणि पाँटिंगशी बरोबरी
रोहित शर्मा हा सर्वाधिक षटकार मारणाऱया फलंदाजांत तिसऱया क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने 101 धावा जमविताना 9 चौकार, 6 षटकार नोंदवत लंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले. जयसूर्याने 270 षटकार नोंदवले असून रोहितचे आता 273 षटकार झाले आहेत. पाकचा अष्टपैलू शाहिद आफ्रिदीच्या नावावर सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाची नोंद असून त्याने 351 तर दुसऱया स्थानावरील विंडीजच्या ख्रिस गेलने 331 षटकार नोंदवले आहेत.
याशिवाय रोहितने 30 वे वनडे शतक नोंदवत ऑस्ट्रेलियाच्या पाँटिंगशी बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 452 डावांत 49, कोहलीने 261 डावांत 46, रोहित व पाँटिंग यांनी 234 व 365 डावांत प्रत्येकी 30, जयसूर्याने 433 डावांत 28 वनडे शतके नोंदवली आहेत.