लोणावळा / प्रतिनिधी :
आपल्या सरकारी अधिकाऱ्यांना शंभर-शंभर कोटीचे टार्गेट देणाऱ्या महाविकास आघाडीने वेदांता फॉक्सकॉन कंपनीकडे किती कोटीची खंडणी मागितली, याची माहिती आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी द्यावी, असे आवाहन भाजपा आमदार व प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी वडगाव मावळ येथे सोमवारी केले.
आदित्य ठाकरे यांनी मावळात येऊन वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत चुकीची माहिती देत युवकांची व महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केली, असा आरोप करत भाजपाच्या वतीने आज महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी वडगाव मावळ येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
अधिक वाचा : PFI च्या निशाण्यावर संघ मुख्यालय, भाजपचे ज्येष्ठ नेते
राम कदम यांनी महाविकास आघाडी तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री मंत्रालयात कधी गेले नाहीत, त्यांनी वेदांता फॉक्सकॉनसोबत करार कधी केला नाही, कोणता एमओयू केला नाही, कोठे जमिनीचे भूसंपादन केले नाही आणि आता ते हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची ओरड करत जनतेची दिशाभूल करत आहेत. वेदांता फॉक्सकॉनचे अधिकारी प्रकल्प महाराष्ट्रात व तोदेखील तळेगाव येथे करायचा, असे म्हणत होते. तेव्हा यांच्या तोंडावरील मास्कदेखील खाली आला नाही. जे स्वतःच्या आमदार व खासदारांना दोन वर्षात भेटले नाही ते कंपनीच्या अधिकाऱयांना कधी भेटणार, असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षात फक्त पाच वेळा मंत्रालयात गेले. ते सहाव्यांदा गेले असल्याचे पुरावे द्या व 1 कोटीचे बक्षिस मिळावा, अशी ऑफरही राम कदम यांनी या वेळी दिली.