तातडीने नागरिकांच्या समस्या सोडविण्याची सूचना : घरे कोसळलेल्यांना 24 तासात नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन

प्रतिनिधी /बेळगाव
रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसानंतर सोमवारी मात्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे भारतनगर चौथा क्रॉस येथे घर कोसळले तर अनेक ठिकाणी पाणी शिरले. त्यामुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि महानगरपालिकेचे आयुक्त रुदेश घाळी यांनी त्याठिकाणी तातडीने भेट देऊन पाहणी केली. यावेळी अधिकाऱयांना सूचना केल्या.
पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तातडीने शाळांना सुटी जाहीर केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांना ज्याप्रकारे माहिती मिळत गेली त्याठिकाणी त्यांनी तातडीने भेट दिली. यावेळी नुकसानग्रस्तांची विचारपूसही त्यांनी केली. भारतनगर, शहापूर येथील आनंदा बिर्जे यांचे घर कोसळले. त्यामुळे दोन कारचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱयांनी तेथे पाहणी करून 24 तासांत नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले. याचबरोबर या घराला लागून असलेली घरेही धोकादायक बनल्यामुळे तेथील नागरिकांनाही इतरत्र स्थलांतरित होण्याची सूचना केली.
येळ्ळूर रस्त्यावरील अन्नपूर्णेश्वरीनगर, केशवनगर या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यावरही गुडघाभर पाणी होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी त्याठिकाणीही धाव घेतली. इतकी गंभीर समस्या असताना यापूर्वीच याठिकाणी गटारींची खोदाई का करण्यात आली नाही? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यावेळी नागरिकांनी अनेक तक्रारी सांगितल्या. नेहमीच हा प्रकार सुरू आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही, अशी तक्रारही करण्यात आली.
अनगोळ येथील रघुनाथपेठमधील एका घराची भिंत कोसळली. त्या ठिकाणीही जिल्हाधिकाऱयांनी भेट दिली. तेथे असलेल्या कुटुंबांना तातडीने स्थलांतरित करा, असे सांगितले. शिवाजीनगर येथील पंजीबाबा या परिसरात पाणीच पाणी झाले. त्या ठिकाणीही जिल्हाधिकारी पाटील व महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी भेट देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी फिरले अनवाणी
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नुकसान झालेल्या परिसरामध्ये भेट देताना पायात चप्पलदेखील घातले नाहीत. अनवाणी पायांनी फिरून त्यांनी पाहणी केली.
शहरातील चार घरे पूर्णपणे कोसळली
शहरातील 4 घरे पूर्णपणे कोसळली आहेत तर 10 घरांमध्ये पाणी शिरले आहे. घरे कोसळलेल्यांना तातडीने नुकसानभरपाई दिली जाणार आहे. प्रथम 10 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. 24 तासांमध्ये ही नुकसानभरपाई दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हय़ात खबरदारी घेण्याची सूचना
कृष्णा, मलप्रभा नदीकाठावर पूरपरिस्थिती सध्या नाही. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. बळ्ळारी नाला परिसरातही पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी पाऊल उचलणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. खबरदारी म्हणून जिल्हय़ात 388 निवारा केंद्रे सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पूरभागातील नागरिकांना त्याठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱयांनी भेट दिलेल्या परिसरातील जनतेच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार आर. के. कुलकर्णी, भाग्यश्री हुग्गी व इतर अधिकारी उपस्थित होते.
तातडीने चार कुटुंबांना नुकसानभरपाई
भारतनगर, चौथा क्रॉस येथील आनंद कल्लाप्पा बिर्जे यांचे संपूर्ण घर कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने 95 हजार 100 रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. राम मष्णू वाईंगडे (रा. चौथा क्रॉस भारतनगर), अभिषेक एस. करिगार (रा. आंबेडकर कॉलनी, अनगोळ), सागर शिवाप्पा कोप्पद (रा. बसव सर्कल, बैलहोंगल) यांना प्रत्येकी 10 हजार रुपये नुकसानभरपाई तातडीने देण्यात आली आहे.