मागील वर्षी 84 वेळा इंटरनेट शटडाउन ः 49 वेळा जम्मू-काश्मीरमध्ये कारवाई ः जगभरात 187 वेळा इंटरनेट बंद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इंटरनेट शटडाउन करण्याप्रकरणी भारत सलग पाचव्या वर्षी सर्वात पुढे राहिला आहे. 2022 मध्ये जगात एकूण 187 वेळा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली, यातील 84 वेळा ही बंदी भारतात लागू करण्यात आली आहे. यातही सर्वाधिक इंटरनेट शटडाउन जम्मू-काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. तेथे वर्षभरात 48 वेळा इंटरनेट बंद झाले आहे. यासंबंधीचा अहवाल न्यूयॉर्कमधील डिजिट राइट्स ऍडव्होकेसी ग्रूप ऍक्सेस नाउने जारी केला आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मध्ये काश्मिरातील राजकीय अस्थिरता आणि हिंसेमुळे सलगतीन दिवस इंटरनेट शटडाउन राहिले होते. याकरता एका मागोमाग एक 16 आदेश जारी करण्यात आले होते. ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारकडून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर आणि जम्मू-काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आल्यावर सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव येथील अनेक भागांमध्ये काही काळ वायरलेस कम्युनिकेशनवर बंदी घातली होती.

यादीत युक्रेन दुसऱया क्रमांकावर
या अहवालातील यादीत युक्रेन दुसऱया क्रमांकावर राहिला आहे. मागील वर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियाकडून युद्ध सुरू करण्यात आल्यावर रशियन सैन्याने सुमारे 22 वेळा युक्रेनमधील इंटरनेट कनेक्शन तोडले होते. रशियाच्या सैन्याने सायबर हल्ले घडवून आणत टेलिकम्युनिकशन इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या यादीत इराण तिसऱया क्रमांकावर राहिला असून मागील वर्षी तेथील प्रशासनाने 18 वेळा इंटरनेट लॉकडाउन केले होते. तेथे 16 सप्टेंबर रोजी 22 वर्षीय कुर्दिश युवती म्हासा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यावर देशभरात सरकारविरोधी निदर्शने झाली. ही निदर्शने रोखण्यासाठी सरकारने इंटरनेटवर बंदी घातली होती.
इंटरनेट बंद करण्यामागे अनेक कारण
इंटरनेट सेवा बंद करण्यामागे निदर्शने, हिंसा, परीक्षा आणि निवडणूक देखील कारण ठरले आहे. जम्मू-काश्मीरनंतर राजस्थानात सर्वाधिक 12 वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तर पश्चिम बंगालमध्ये 7 वेळा इंटरनेट शटडाउन झाले आहे. 2016 पासून जागतिक स्तरावर इंटरनेट शटडाउनमध्ये भारताची हिस्सेदारी 58 टक्के आहे. सद्यकाळात इंटरनेट शटडाउनचा अधिकार केंद्रीय तसेच राज्य स्तरावर गृह मंत्रालयाकडे आहे.
इंटरनेट बंदमुळे मोठे नुकसान
2021 मध्ये जगभरात एकूण 30 हजार तास इंटरनेट बंद करण्यात आले होते, यामुळे 5.45 अब्ज डॉलर्स म्हणजेच 40,300 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. शटडाउनमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या देशांमध्ये भारत तिसऱया स्थानावर होता. भारतात 2021 मध्ये 1,157 तास इंटरनेट बंद राहिले, ज्यामुळे सुमारे 4,300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इंटरनेट बंद करण्यात आल्याने 5.9 कोटी लोक प्रभावित झाले होते.