15 जण ठार ः पहिल्यांदाच नागरी भागात डागले क्षेपणास्त्र
वृत्तसंस्था/ दमास्कस
इस्रायलने रविवारी सकाळी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये क्षेपणास्त्रs डागली आहेत. सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सनुसार एका इमारतीवर झालेल्या या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले. हा हल्ला काफर सोउसेमध्ये झाला असून या भागात सीरियाची सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर मुख्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱयांची निवासस्थाने आहेत.
इस्रायलने गोलन हाइट्सच्या दिशेकडून दमास्कस तसेच नजीकच्या भागात हवाई हल्ले केले आहेत. यापूर्वी इस्रायलने अनेकदा दमास्कसला लक्ष्य केले आहे, परंतु पहिल्यांदाच नागरी वस्तीवर हल्ला केला असल्याचे सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
हा हल्ला मिसफायर्ड सीरियन अँटी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रामुळे झाल्याचाही दाव आहे. तर सीरियावरील हल्ल्याबाबत इस्रायलचे सैन्य कुठलीच टिप्पणी करत नाही. परंतु मागील 10 वर्षांपासून सीरियात स्वतःचा प्रभाव निर्माण करू पाहणाऱया इराणपुरस्कृत गटाच्या विरोधात इस्रायलने अनेकदा एअरस्ट्राइक केला आहे.

इराणी घुसखोरीची भीती
या गटाकडून शस्त्रास्त्र जमविण्यात आलेल्या ठिकाणी इस्रायलचे सैन्य हल्ला करत असते. या गटांमध्ये लेबनॉनचा हिजबुल्लाहचा प्रामुख्याने समावेश आहे. इसायलच्या हवाई हल्ल्यांनी अनेकदा सीरियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला नष्ट केले आहे. इस्रायलला स्वतःच्या उत्तर सीमेवर इराणी घुसखोरीची भीती सतावत असते, याचमुळे इस्रायलकडून इराणचे तळ तसेच लेबनॉनी दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले केले जातात.
हिजबुल्लाह ही लेबनॉनच्या शिया मुस्लिमांची दहशतवादी संघटना तसेच राजकीय पक्ष देखील आहे. 1982 मध्ये इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनी लेबनॉनमध्ये शिरलेल्या इस्रायली सैन्याच्या विरोधात हिजबुल्लाहची स्थापना केली होती. हिजबुल्लाहला इराण तसेच सीरियाकडून मदत मिळते.