सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच कामाला प्रारंभ
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून येथून प्रवास करणे जीवावर बेतण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत गेल्या महिन्याभरापासून या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. तसेच दहा-बारा तास वाहतूक ठप्प झाली होती. अशा परिस्थितीत प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केले होते. यासाठी या भागातील सामाजिक कार्यकर्ते किरण गावडे यांनी रस्ते प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करून धारेवर धरले व मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. यानंतर या रस्त्याची तात्पुरती डागडुजी सुरू करण्यात आली.
बेळगाव-चोर्ला रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून गोवा राज्याला मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. मात्र प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त करण्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. या भागातील नागरिकांनी अनेकवेळा निवेदने देवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी देखील केली होती. तसेच येथील लोकांनी रस्ता आपल्यापरीने दुरुस्त करून खड्डे बुजविले होते. परंतू मोठय़ा वाहतुकीमुळे पुन्हा खड्डे पडून या खड्डय़ात पाणी साचल्याने अनेक अपघात घडत आहेत. आमटे येथील एका युवकाचा या खड्डय़ामुळे मृत्यू देखील झाला आहे. आहे. तसेच एका दांपत्यांचा अपघात होऊन दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहे.
बेळगाव-चोर्ला रस्ता रुंद करण्यात येणार असून याचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. याचे कंत्राटही देण्यात आले आहे. या कंत्राटदाराला रस्ता नव्याने होईपर्यंत डागडुजी करून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करून देण्याच्या अटी घालून कंत्राट देण्यात आले आहे. मात्र कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे येथून वाहतूक करणे जिकीरीचे बनले होते. या सर्व बाबींचा विचार करून किरण गावडे यांनी या रस्त्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर व इतर वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करून धारेवर धरले होते. जर रस्ता वाहतुकीस योग्य केला गेला नसल्यास अपघात घडून जीवितहानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन गुरुवारी रस्ता दुरुस्तीच्या कामास सुररात करण्यात आली आहे. याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.