2 डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
वेरोडा, कुंकळ्ळी येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानचा वार्षिक कालोत्सव तथा जत्रोत्सव बुधवार 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थान राष्ट्रीय महामार्गावरील पांजरखणी येथून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आणि श्री चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर असलेल्या पर्वताच्या दक्षिणेकडील पायथ्याशी वसलेले आहे. हे मंददिर पुरातन मंदिरांपैकी एक असून हल्ली या मंदिराची बऱयाच प्रमाणात प्रगती झाली आहे. याकामी अनेक भाविकांची सढळ हस्ते मदत लाभली आहे.
नवसाला पावणारी देवी म्हणून श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण देवीची एक वेगळी ख्याती आहे. गोवा तसेच शेजारील राज्यांत देवीचे कुळावी, भाविक आहेत. श्रावणी सोमवार, नवरात्रोत्सव, शिमगोत्सव व कालोत्सव तथा जत्रोत्सव हे मुख्य उत्सव येथे मोठय़ा प्रमाणात साजरा केले जातात. यंदा या देवस्थानच्या वार्षिक कालोत्सवाचा प्रारंभ अष्टमीला 30 नोव्हेंबर रोजी होत असून सकाळी गणेशपूजन, श्रींस महाभिषेक, नंतर महानैवेद्य, मंगळारती, रात्री 9.30 वा. पालखी मिरवणूक, नंतर ‘अष्टदिकपाल’ उत्सव रथातून वाद्यांच्या तालावर श्रींची भव्य मिरवणूक, गणेशवंदना कार्यक्रम आणि ‘काणी नव्या युगाची’ हा कोकणी नाटय़प्रयोग होईल.
गुरुवार 1 डिसेंबर रोजी सकाळी अभिषेक व इतर धार्मिक विधी, रात्री 9 वा. अंतर्नाद क्रिएशन निर्मित व यतीन तळावलीकर प्रस्तुत मराठी भक्ती व भावसंगीताचा कार्यक्रम ‘रंग स्वरांचे’ आणि नंतर श्रींची विजयरथातून भव्य मिरवणूक होईल. शुक्रवार 2 डिसेंबर रोजी सकाळी अभिषेक, आरती, रात्री 10 वा. देणगी कुपनांचा निकाल व नंतर 10.30 वा. आरोही व आरोक्ष नवलेश देसाई यांच्या सौजन्याने ‘ऑर्केस्ट्रा ओम मेलोडीज’, रात्री जागर, पहाटे 1.30 वा. श्रींची ‘ब्रह्मरथा’तून भव्य मिरवणूक, नंतर आरती व प्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल.
वर्षपद्धतीप्रमाणे उत्सवाच्या दरम्यान दुपारी व रात्री महाभोजन राहील. तसेच 2 डिसेंबर रोजी कार्यक्रमाच्या आधी श्रींस अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव पुकारण्यात येईल. भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे. श्रींचा वार्षिक उत्सव यशस्वी करण्यासाठी नवीन समितीचे अध्यक्ष गौरीश फडते देसाई, सचिव राहुल देसाई, कोषाध्यक्ष प्रकाश देसाई व मुखत्यार दामोदर देसाई यांनी विशेष लक्ष दिले आहे.