अ. भा. टेनिस असोसिएशनकडे यजमानपद मिळवून देण्यासाठी करणार पाठपुरावा
संग्राम काटकर कोल्हापूर
इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनची (आयटीएफ) टेनिस स्पर्धा खेळणे टेनिसमध्ये प्रतिष्ठेचे समजले जाते. ही स्पर्धा कोल्हापुरातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच टेनिसपटूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. आता हीच संधी अनेकांना मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनने (केडीएलटीए) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे सचिव सुंदर अय्यर यांच्याकडे इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या स्पर्धेचे यजमानपद मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच दिवाळीनंतर आयटीएफच्या नियम-अटी पूर्ण कऊन कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राऊंडजवळील केडीएलटीएच्या टेनिस संकुलात आयटीएफ स्पर्धा आयोजनासाठी लागणारे इंफ्राट्रक्चर बनण्याचे काम केडीएलटीएकडून केले जाणार आहे.
आयटीएफ टेनिस स्पर्धा ह्या बहुधा पुणे, मुंबई, दिल्ली, यासह देशातील ज्या राज्यात आवश्यक ते इंफ्राट्रक्चर आहे, तेथे होत असते. मागील स्पर्धांमध्ये मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय गुणांच्या जोरावर खेळाडूला सहभागी होता येते. युरोपसह अमेरिका येथे सातत्याने आयटीएफ स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये तेथील टेनिसपटू मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुभवासह गुणांचीही कमाई करतात. कोल्हापुरातील मनाल देसाई, संतोष घाटगे, प्रतिक आगवणे, आंतरराष्ट्रीय टेनिसस्टार ऐश्वर्या जाधव, राष्ट्रीय टेनिसपटू संदेश कुरळे व सोनल पाटील यांनी आपल्या हिंमतीवर राष्ट्रीय पातळीवरील विविध टेनिस स्पर्धांमध्ये मोठी रँकिंग मिळवून आयटीएफ स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळवली आहे. या स्पर्धेत हे सर्व फक्त खेळले नाहीत तर त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंना झुंज दिली आहे. ऐश्वर्यानेही परदेशातील आयटीएफ स्पर्धा खेळताना तुल्यबळ खेळ कऊन जागतिक पातळीवर आपला ठसा उमटला.
एकंदरीत हीच आयटीएफ स्पर्धा कोल्हापूरतील टेनिसप्रेमींना जवळून पाहता यावी, शिवाय नव्या दमाच्या खेळाडूंमध्ये आयटीएफ स्पर्धा खेळण्याची उर्मी निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनने (केडीएलटीए) पुढाकार घेतला आहे. आयटीफ स्पर्धा आयोजनासाठी इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या नियम-अटीनुसार टेनिस कोर्टसह अन्य सुविधा असाव्या लागतात. जसे की कमीत कमी चार टेनिस कोर्ट असावेत, कोर्टवर फ्लड लाईट असावी. कोर्टच्या भोवतीने किंवा बाजूला प्रेक्षक गॅलरी असावी. महिला-पुरुष खेळाडूंसाठी चेंजिंग रूम्स् तर आयटीएफ सुपरवायझर, पंच, व स्पर्धा आयोजक कमिटी यांच्यासाठी टेनिस कोर्टवर बैठक व्यवस्था असावी. आरोग्य व इंज्युरीच्या दृष्टीने डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट व शुद्ध पाणी देण्यासाठी वॉटर फिल्टर असावा लागतो.
मेरी वेदर येथील टेनिस संकुलात सध्या सहा टेनिस कोर्ट व दोन सरावासाठीचे कोर्ट आहेत. यापैकी दोन कोर्ट फ्लड लाईटने सज्ज आहेत. आणखी दोन कोर्टवर फ्लड लाईट लावली जाणार आहेत. याशिवाय सहाही टेनिसच्या उत्तर दिशेला मोठी बैठक व्यवस्था कण्याचे नियोजन केले जाणार आहे. खेळाडूंसाठी चेंजिंग रूम, वॉश रुम, यासह विविध प्रकारच्या सुविधा तर पूर्वीपासूनच टेनिस संकुलात आहेत. त्यामुळे या टेनिस संकुलात 18 वर्षाखालील मुले-मुली, वुमन्स (खुला गट) आणि 35 वर्षावरील पुरुष अशा या गटात आरटीएफ टेनिस स्पर्धांचे आयोजन करणे केडीएलटीएला शक्य आहे. त्यामुळे स्पर्धांचे यजमानपद मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया टेनिस असोसिएशनकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्यांच्याकडून स्पर्धा आयोजनसंदर्भातील पत्र मिळाल्यानंतर केडीएलटीए तयारी लागणार आहे.
म्हणून तयार केले एशियन सर्किट…
ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनकडे पाठपुरावा करून एशियन सर्किट तयार करवून घेतले. युरोप व अमेरिकेच्या बरोबरीने आशिया खंडातही जास्ती आयटीएफ स्पर्धा व्हाव्यात, स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना प्रतिनिधित्व करात यावे, हा एशियन सर्किट तयार करण्यामागचा उद्देश आहे. एशियन सर्किटच्या माध्यमातून होणाऱ्या आयटीएफ स्पर्धांमधून खेळाडूंना टेनिसमधील वैयक्तिक मानांकन वाढवता येणार आहे. जितके जास्त मानांकन मिळेल तितक्या जास्ती आयटीफ टेनिस स्पर्धा खेळता येणार नाही.
शितल भोसले (सहसचिव : महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन)