
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 12 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय युजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केएलई इंटरनॅशनल स्कूल अ संघाने केएलई इंटरनॅशनल स्कूल ब संघाचा 63 धावांनी पराभव करत युजी चषकावर आपले नाव कोरले. कलश बेनकट्टीला मालिकावीर, सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
जिमखाना मैदानावर अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना केएलई अ संघाने 25 षटकात 5 बाद 159 धावा केल्या. त्यात कनिष्क बेनकटी 48, कलश बेनकटी 33, कौस्तुभ पाटील 22 धावा केल्या. केएलइ ब तर्फे रोहन पर्सन्नावर, जिया मुल्ला, एस. आर. वर्षन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलइ ब संघाने 22.4 षटकात सर्व बाद 96 धावा केल्या. शिद्रायने 30, युग शहाने 14 धावा केल्या. केएलई अ तर्फे सलमान धारवाडकर व कलश बेनकट्टी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रमुख पाहुणे जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर व किरण बेनकट्टी यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक बक्षीसे विजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे, परसराम पाटील तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
अंतिम सामन्यातील सामनावीर कलश बेनकटी, उत्कृष्ट फलंदाज कौस्तुभ पाटील, उत्कृष्ट गोलंदाज ओमकार करेहोना, उगवता खेळाडू रोहन पर्सन्नावर, इम्पॅक्ट खेळाडू अथर्व चतुर तर मालिकावीर कलश बेनकटी यांनी वैयक्तिक बक्षीसे पटकावली.