सोयीसुविधा उपल्बध झाल्यास चित्रीकरण वाढणार; स्थानिक कलाकारांना मिळणार रोजगार
अहिल्या परकाळे कोल्हापूर
कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 17 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून चाळ, वाडा, स्टुडिओ, गारमेंट, रस्ते, विद्युतीकरण, देऊळ, पाणीपुरवठा, बागबगीचा, रेल्वे स्टेशन तयार केले जाणार आहे. जेणेकरून चित्रनगरीचा विकास होईल आणि कोल्हापुरात चित्रीकरणासाठी जास्तीत जास्त मालिका, चित्रपट येतील. त्यामुळे विकासाबरोबर चित्रनगरी कलाकारांनी फुलणार आहे. यातून कोल्हापूरच्या चित्रपट सृष्टीला गतवैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीने हा निधी महत्वपूर्ण ठरणार आहे.
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूरच्या चित्रनगरीची कलापंढरी म्हणून ओळख आहे. परंतू अलीकडच्या काळात आलेले अडगळीचे स्वरूप बदलून आता मात्र चित्रीकरणासाठी चित्रनगरी सज्ज आहे. येथे मालिकांचे चित्रीकरण सुरू असून इतर ठिकाणीही चित्रीकरणासाठी बेस्ट स्पॉट असल्याने निर्मात्यांचा ओढा चित्रनगरीकडे आहे. वसतीगृह, मोठी चाळ, वाडा, सुशोभिकरणासाठी शासनाने दिलेल्या 17 कोटी अनुदानापैकी 5 कोटींच्या बांधकामांना मंजूरी मिळाली असून, टेंडरही काढण्यात आले आहे. यातून स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी मिळत आहे.
गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. निर्मात्यांना चित्रिकरणाचा सेट उभारण्यासाठी चित्रनगरीतील दोन एकरचा एक प्लॉट दिला जातोय. जेणेकरून निर्मात्याला आपल्याला पाहिजे तसा सेट उभारून चित्रिकरण करता येईल. चित्रनगरी व्यवस्थापन आणि सरकारच्या प्रयत्नामुळे कोल्हापुरात चित्रिकरणासाठी खर्चही कमी येतो, त्यामुळे अनेक निर्मात्यांना कोल्हापुरात चित्रीकरण करणे परवडते, असेही काही कलाकारांचे म्हणणे आहे. सध्या चार मालिकांचे चित्रीकरण सुरू असल्याने स्थानिकांना रोजगाराची संधी मिळत आहे. परंतू सरकारने दिलेल्या निधीतून चित्रनगरीत आणखी सोयीसुविधा दिल्यास मालिका व चित्रपट चित्रीकरणासाठी येतील, असे स्थानिक कलाकारांचे म्हणणे आहे.
इनडोअर शुटींग स्पॉट
चित्रनगरी, शिवाजी विद्यापीठ, किरण बंगला, गाठांचा वाडा यासह शहर आणि परिसरात अनेक चांगले बंगले भाडय़ाने घेऊन काही मालिकांचे चित्रिकरण केले जात आहे. त्यामुळेच चित्रनगरीत सर्वच सोयीसुविधा एकाच ठिकाणी देण्याचा चित्रनगरी व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.
आऊटडोअर शुटिंग स्पॉट
रंकाळा तलाव, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, न्यू पॅलेस, पंचगंगा नदी घाट, पन्हाळा परिसर, भुदरगड, गगनबावडा, राधानगरी, बाहुबली, नृसिंहवाडी, जोतिबा मंदिर परिसर, काळम्मवाडी, दाजीपूर जंगल, यासह अन्य भागात आऊटडोअर शुटिंग करता येते.
रेल्वे स्टेशन तयार करण्यासाठी घेणार स्पर्धा
चित्रनगरीत रेल्वे स्थानकाच्या एका बाजूला शहर आणि दुसऱया बाजूला ग्रामीण भाग तयार करण्यात येणार आहे. या रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार आगळेवेगळे असावे यासाठी एक स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धकांच्या संकल्पनेतील उत्कृष्ट प्रवेशव्दाराची निवड केली जाणार आहे.
नऊ कोटी कामासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
चित्रनगरीसाठी शासनाने 17 कोटीचे अनुदान मंजूर केले आहे. त्यापैकी 9 कोटींच्या कामासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये एक वाडा, चाळ, मंदिर, स्टुडिओ, 20 खोल्यांचे वसतिगृह, अंतर्गत रस्ते, ट्रीट लाईट, पाणीपुरवठा आदी कामे पूर्ण केली जाणार आहेत.
संजय पाटील (व्यवस्थापकीय संचालक, कोल्हापूर चित्रनगरी)