सौरभ मुजुमदार
कोल्हापूर: ब्रिटिश राजवटीत कोल्हापूरच्या छत्रपतींनी परदेशी अधिकाऱ्यांचा, त्यांच्या चाणाक्ष बुद्धीचा, वास्तुशास्त्राचा योग्य वापर करून अनेक वास्तू साकारल्या. अशीच एक वास्तू म्हणजे “जुना पूल” होय. याची नोंद कागदपत्रात सापडतली आहे. कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक व दररोज नवनवीन इतिहासाचा माहितीचा खजिना बाहेर काढण्यासाठी धडपडणारे आपले मित्र भारत महारूगडे यांच्या अमूल्य अशा या संग्रहातून हे समजते.
सध्याच्या सीपीआर चौकातून न्यू पॅलेस कडे जाताना उजव्या बाजूला रस्त्यावर छोटा पूल लागतो. तीच ही वास्तू होय. मेजर वॉल्टर एम् डकेट आर. ई. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर कोल्हापूर यांच्या अनेक वास्तुवैभवातून साकारलेल्या अनेक वास्तूंपैकी ही एक वास्तू होय.या पुलावर चारही बाजूला असणार्या छोट्या माहितीच्या कोनशिला हीच याची साक्ष आजही देत आहेत. इ.स. १८७६ ला कोल्हापूरच्या छत्रपतींनी हा पूल बांधल्याची नोंद याच कोनशीलेवर सुस्थितीत आहे .नवीन राजवाड्याचे बांधकाम, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे बांधकाम ,याच काळातील सर्व व्यवस्थेसाठी तसेच रेसिडेन्सी इमारतीला जाण्यासाठीच हा छोटा परंतु अत्यंत नाजुक व कोरीव व व्हिक्टोरियन स्थापत्यशास्त्र असणारा हा असामान्य पूल आज मात्र आपल्याकडून दुर्लक्षित आहे असे वाटते. याच पुलावरून कोल्हापूरच्या छत्रपतींचा लवाजमा जात असावा, दसऱ्याच्या सिमोल्लंघन सोहळ्याची छत्रपती परिवाराला घेऊन जाणारी व कोल्हापूरचे वैभव असणारी मेबॅक गाडी आजही याच पुलावरून जाते.
नवीन राजवाडा व जुना राजवाडा या दरम्यान अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा हा पूल इतिहासाच्या दृष्टीने फारच महत्त्वपूर्ण आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूकडील प्रवेशाचे बांधकाम त्यावरील अत्यंत बारीक नक्षीकाम सध्या थोडेफार खिळखिळे होऊ लागलेले आहे.पुलासोबत असणाऱ्या चारही कोनशिला या नवीन रस्ता सुधारणेमध्ये मुजत चाललेल्या आहेत. निदान या कोनशिला जरी आपल्या या पुढच्या पिढीला दृष्टिक्षेपात वाचनात आल्या तरी देखील या पुलाचे सौंदर्य नक्कीच अबाधित राहील कारण ही पिढी फारच जागरूक आहे.
एखादी वास्तू जी अनेक घटनांचा मूक साक्षीदार असते. तिला दुसरा पर्याय आला की ती आपण सहजपणे विसरून जातो. परंतु या सोबत आपणच आपला इतिहास कदाचित विसरत नाही ना याचा क्षणभर तरी विचार व्हावा. आपण आत्ताच्या प्रगत तंत्रज्ञानात देखील अशा वस्तूंची निर्मिती करू शकत नाही निदान त्या सांभाळू तरी शकतो.