भोगावती/प्रतिनिधी
परिते (ता.करवीर) येथे लम्पी स्किन आजाराची लस टोचण्यासाठी आणलेली गाय उधळल्याने फरफट नेऊन गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. परिते गावाजवळील शेतातच शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सतीश शंकर कारंडे (वय ५०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी व नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मयत कारंडे हे शेती व दुग्धव्यवसाय करतात. त्यांचा शेतातच जनावरांचा गोठा आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने परिते येथे आज लम्पी स्किन आजारावरील लस टोचणीचे शिबीर होते. त्यांनी एका गायीला लस देऊन आणली. तर दुसऱ्या गायीला लस देण्यासाठी ते गोठ्यातून घेऊन आले होते. लस घेतल्यानंतर गायीला गोठ्याकडे घेऊन जात असताना वाटेतच गाय उधळली. उधळलेल्या गाईने सतीश कारंडे यांना फरपटत नेल्याने ते गंभीर जखमी झाले. यामध्ये त्यांच्या पायासह शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. रुग्णालयात उपचार चालू असतानाच त्यांचा दुपारी मृत्यू झाला.
त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर परिते येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परीवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी ९ वाजता परिते येथे आहे.