विजय पाटील/असळज
gaganbawada tourism: ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून गगनबावाड्याचा उल्लेख केला जातो. कोकणला जोडणारा दुवा म्हणून गगनबावड्य़ातील करूळ व भुईबावडा या दोन घाटांचा समावेश होतो.गगनबावडा तालुक्यातील श्रावणातील रिम-झिम पाऊस वर्षा पर्यटनाला साद घालत आहे.
पावसाळ्यातील हिरवेगार डोंगर सतत पडणारा पाऊस पर्यटकांना आकर्षित करत आहे.गगनबावड्य़ातील निसर्गात हिरवळीवर भर घालण्यासाठी असणारे व निळेसार पाणी असणारे लखमापूर, अणदूर, कोदे, वेसरफ या ठिकाणचे तलाव पर्यटकांना निसर्ग सौदर्याचे नेहमीच आकर्षण आहे.सहाजिकच पर्यटकांचा त्याठिकाणी ओढा वाढलेला दिसतो.पर्यटक शनिवार, रविवार या दिवशी गर्दी करत आहे. पाण्याने भरलेले तलाव सभोतालची हिरवळ झाडे ,काही तलावाच्या ठिकाणी असणारे सिमेंट कट्टे, मनसोक्त पोहणे त्यामुळे तलावा ठिकाणी कुटुंबासह सहली आयोजित केल्या जात आहेत.परंतु पावसामुळे पाण्याची पातळी जास्त असलेने तलावात कोणी सहसा अंघोळ करत नाही.पर्यटकांच्या वाढत्या वावरामुळे सभोतली चार चाकी, दोन चाकी वाहनांची गर्दी दिसून येते.त्यामुळे तलावाजवळ पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येतात. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर असणारे धाबे तर पर्यटकांना मेजवानीसाठी जणू आमंत्रणच देत आहेत.त्यामुळे पर्यटकांना जेवणासाठी पायपीट किंवा त्रास सहन करावा लागत नाही.

गगनबावडय़ातील गगनगिरी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या गगनगिरी मठावरून (गगनगड ) कोकण दृश्य टिपण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.घाटातील विहंगमय दृश्य टिपण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.पर्यटकांना तेथे मिळणाऱया सोयी सुविधा समाधानाच्या वाटतात.दोन्ही बाजूला असणारे नागमोडे घाट सर्वांचे लक्ष वेधून घेतात.कोकणातील अथांग पर्वत रांगा डोळ्यांचे पारणे फेडतात.कोकण दर्शन याच गडावरून पर्यटकांना पहावयास मिळते.पळसंबे येथील शांत वातावरणातील ‘रामलिंग मठ’ (पुरातन लेणी ) पुरातन काळाची आठवण करून देतात.पांडवकालीन कलाकृती पर्यटकांना इतिहास आठवून देतात.बोरबेट येथील मोरजाई पठार, वेताळ माळ त्याचबरोबर बावेली येथील धबधबा देखील पर्यटकांना आकर्षित करत आहे. येथील निसर्गाच्या सानिध्याचा पर्यटकांना आस्वाद घेता येतो.त्यामुळे वर्षा सहलीला गगनबावडा साद घालत आहे.