लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शंभर धनगरी ढोलांचा गजर : अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी मल्हार सेनेच्या वतीने मिरवणूक
प्रतिनिधी/कोल्हापूर
अहिल्यादेवी होळकर जयंती आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शंभर धनगरी ढोलांच्या गजरात शाहू समाधी स्थळ येथील शाहू महाराज यांच्या पुतळय़ाला अभिवादन करून, मिरवणूकीला सुरूवात केली. आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला. भंडाऱ्याची उधळण करीत अहिल्यादेवी होळकरांचा नावाचा जयघोषाने शाहू समाधी स्थळ दणाणून गेले होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मल्हार सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणूकीतील चित्ररथाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. ‘होळकरशाहीने भारतात लोखंड व पितळेचे कारखाने सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास इंग्रजीत लिहून परदेशात प्रसार केला. अहिल्यादेवीच्या काळात मंदिरे, मशिदी, गिरीजा घरांचा विकास झाला. त्यांनी केलेला न्याय निवाडा दोन्ही पक्षांना मंजूर असायचा. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जेवणातून वारंवार विषप्रयोग केले जात होते, हे धाकलू धनगराला समाजले तेंव्हा त्याने संभाजी महाराज यांना दिलेल्या अंगठीच्या माध्यममातून त्यांच्यावर होणाऱ्या विषप्रयोगाची माहिती त्यांना मिळत होती. राजर्षी शाहू महाराज यांनी आपली बहिण चंद्रप्रभाराजे घाटगे व राजे यशवंतराव होळकर यांचा आंतरजातीय विवाह लावून दिला होता, अशा आशयाची पोस्टर चित्ररथात लावून समाजप्रबोधन केले.
शाहू समाधीस्थळ, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महापालिका, सीपीआरमार्गे पुन्हा दसरा चौकात मिरवणूकीची सांगता करण्यात आली. पिवळी टोपी, पिवळा फेटा, घोंगडे, परिधान करून धनगरी ढोल वाजवत आणि गजनृत्यातच्या तालावर मिरवणूक पुढे सरकर होती. महिलांनी नऊवारी साडी, पिवळा फेटा परिधान केला होता. हातात पिवळे झेंडे अन भंडाऱयाची उधळण करीत लहानापासून ते वयोवृध महिला व पुरूष आनंद व्यक्त करीत होते. यावेळी मल्हार सनेचे सरसेनापती बबनराव रानगे, बयाजी शेळके, राघू हजारे, छगन नांगरे, शहाजी सिद, राजसिंह शेळके, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, बाबा महाडीक, प्रकाश पाटील, व्यंकाप्पा भोसले, रघुनाथ कांबळे, दिगंबर लोहार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवाजीराव नाईकवाडे आदी उपस्थित होते.