प्रयाग चिखली, वार्ताहर
Kolhapur Accident : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रजपूतवाडी नजीक हॉटेल सई च्या समोर महामार्गावर दोन मोटर सायकलस्वारांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजता घडली.
संतोष बाळासाहेब पाटील ( वय ३४) रा. कदमवाडी आणि अक्षय सुरेश पाडळकर (वय २४ ) रा. भोसलेवाडी अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे असून निलेश संकपाळ हा युवक गंभीर जखमी असल्याचे समजते. घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला.
याबाबतची अधिक माहिती अशी
रविवारी शिवजयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर पन्हाळा रोडवर शिवज्योत नेण्यासाठी आलेल्या मराठा युवकांची प्रचंड गर्दी या रस्त्याला होती. सकाळी सहाच्या सुमारास या मार्गावरील रजपुतवाडी गावाजवळ शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकांच्या दोन मोटरसायकलची समोरासमोर जोराची धडक होऊन मोटरसायकल वरील एकूण पाच पैकी दोघेजण जागीच ठार झाले. तर अपघातातील एक युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका महिलेसह आणखी दोन जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत अपघातात मयत झालेल्या दोघांच्या डोक्याला मोठी दुखापत होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
शिवज्योत नेण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांमुळे या रस्त्यावर प्रचंड रहदारी होती अपघात रस्त्याच्या मधोमध झाल्यामुळे दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम होऊन वाहनाच्या रांगा लागल्या होत्या सुमारे एक तासानंतर करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व रस्त्यावरील वाहने हटवून रस्ता मोकळा करण्यात आला त्यानंतर वाहतूक सुरळीत लागली.
घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला
अपघातात वाहने नेमकी किती?
दरम्यान या अपघातात दोन ठार झाल्यामुळे अपघातामध्ये फक्त दोन मोटरसायकली होत्या की आणखी एखादे मोठे वाहन होते याबाबत उपस्थितांमध्ये उलट सुलट चर्चा चालू होती.
रजपूतवाडी जवळील अपघातात मयत झालेल्या दोघांचे फोटो
अपघातग्रस्त ठिकाणी धडक झालेल्या मोटरसायकली आणि पडलेले मृतदेह