सुधाकर काशीद,कोल्हापूर
आज इथे काय आहे हो?…. गर्दी कशासाठी झाली हो?…..1857 ला इथे काय झाले होते?….बंड? कसले बंड… चिमासाहेब महाराज कोण? मग आज इथे जुन्या राजवाड्यात काय चाललंय? अशा असंख्य प्रश्नार्थक चेहऱ्याने सोमवारी हा जुन्या राजवाड्याचा परिसर खिळून राहिला.
1857 साली म्हणजे 165 वर्षांपूर्वी कालच्या दिवशी (5 डिसेंबर) या जुन्या राजवाड्याच्या परिसरात सशस्त्र क्रांतीचा थरार घडला होता.क्रांतिकारकांच्या रक्ताने हा परिसर भिजला होता. ब्रिटिश सत्तेला धडक देण्याचा अतिशय धाडसी असा हा प्रयत्न कोल्हापुरातल्या सैनिकांनी केला होता.या कटाचा सूत्रधार म्हणून चिमासाहेब महाराजांना आजन्म बंदीवास कराचीत भोगावा लागला होता.कोल्हापूरच्याच नव्हे, देशाच्या क्रांतिकारक इतिहासात हा क्षण नोंदला गेला.पण आजच्या पिढीचा या जुन्या राजवाड्याच्या परिसरातला वावर त्या क्रांतिकारक इतिहासाशी आपले काय देणे घेणे? अशाच तटस्थतेचा राहिला.
जुन्या राजवाड्याच्या या साऱ्या परिसराला क्रांतिकारक इतिहासाची किनार आहे.ब्रिटिश राजवटीच्या विरोधात खदखदणाऱ्या असंतोषाला कोल्हापूरच्या राजघराण्यातूनही कसे अप्रत्यक्ष बळ मिळत होते याचा हा सारा अस्सल इतिहास आहे.165 वर्षांपूर्वी कोल्हापूर संस्थानातील सैनिकांनी ब्रिटिशांच्या सत्तेला अतिशय धाडसाने अशी धडक दिली होती.फिरंगोजी शिंदे,बाबाजी आयरेकर या साहसी वीरांनी व त्यांच्या निडर सहकाऱ्यांनी बंड करून जुना राजवाडा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.ब्रिटिश अधिकाऱ्यांना याची सुरुवातीला फारशी चाहूल नव्हती.पण अचानक झालेल्या या उठावाने मोठा धमाका उडवून दिला.सारी यंत्रणा खडबडून जागी झाली.अर्थात हा उठाव अपुऱ्या मनुष्य व अपुऱ्या शस्त्राच्या बळावर होता.त्यामुळे उठाव पूर्ण ताकदीने यशस्वी झाला नाही.पण कोल्हापूर सारख्या एका टोकाच्या गावात अशा पद्धतीने ब्रिटिश सत्तेला सशस्त्र आव्हान देण्याचा प्रयत्न होतो हेच खूप त्या काळात धक्कादायक असे घडले होते.त्यामुळे ब्रिटिशांनी हा उठाव मोडून काढला.फिरंगोजी शिंदे यांना गोळ्या घालण्यात आल्या.उठावात सहभागी सैनिकांना जुन्या राजवाड्याच्या प्रांगणातच गोळ्या घालून ठार करण्यात आले.रक्तरंजित क्रांतीचा थरार या परिसराने अनुभवला.आणि या सार्या उठावामागे कोल्हापूरचे चिमासाहेब महाराज यांची प्रेरणा आहे असे समजून ब्रिटिशांनी त्यांना कराचीला आजन्म बंदीवासात ठेवले.

अशा कोल्हापूरच्या या क्रांतिकारक लढ्याचा कालचा दिवस म्हणजे वास्तविक कोल्हापूरच्या इतिहासातील खूप मोठी घटना. पण आज अखिल भारतीय मराठा महासंघ वगळता त्याची फारशी कोणी नोंदही घेतली नाही. कोल्हापूर म्हणजे पांढरा तांबडा, कोल्हापूर म्हणजे कार्र कार्र वाजणारे चप्पल, कोल्हापूर म्हणजे जगात भारी असल्यास चर्चेत आपण आज आहोत. आणि कोल्हापूरचा सशस्त्र क्रांतिकारक इतिहास विसरून बसलो आहोत. क्रांती करणारे करून गेले. मरणारे मरून गेले पण आपल्या पिढीने त्याची आठवणी ठेवू नये यासारखे दुसरे दुर्दैव ते काय आहे.
अभिवादनाची गरज..
वास्तविक आज जुन्या राजवाड्याच्या प्रांगणात पुष्प अर्पण करून त्या सशस्त्र कांतिकारकांना साऱ्या कोल्हापुरकरांनी अभिवादन करायला हवे होते.शाळकरी मुलांना या परिसरात आणून हा इतिहास कथन करायला हवा होता.पण मराठा महासंघाचा कार्यक्रम वगळता सगळे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते.जाताजाता बघणारेही हे काय चाललय असे तटस्थतेने विचारत होते.
अज्ञात विरांचा शोध …
या लढ्यातील फिरंगोजी शिंदे याचे घर गिरगाव (ता. करवीर) येथे आहे. बाबाजी आयरेकर यांच्या नातेवाईकांनी काही स्मृती जपल्या आहेत. पण या उठावानंतर चिमासाहेब महाराजांबरोबर त्यांच्या दहा सेवकांना कराचीला नेण्यात आले. 3 6 जणांना राजवाड्याच्या आवारातच गोळ्या घालून मारण्यात आले. त्यांची नावे अज्ञात आहेत. त्या विरांच्या नावाचा शोध इंद्रजीत सावंत, पद्मजा पाटील, गणेश खोडके, राम यादव, भरत महारुगडे, यशोधन जोशी, गणेश नेर्लेकर, अमित आडसुळे यांच्या सारख्या कोल्हापूर अभ्यासकांनी घ्यावा. 1857 च्या या उठावात बलिदान देणारे आपल्या कोल्हापूरचे हे अज्ञात वीर आपल्याशी संबधित असणारेच आहेत.