शिवाजी विद्यापीठात फ्री स्टाईल, ग्रिको रोमन लढतींचा थरार; देशभरातील 172 विद्यापीठातील 1 हजार 979 मल्लांचा सहभाग
कोल्हापूर प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आणि शिवाजी विद्यापीठाच्या हिरक महोत्सव निमित्त विद्यापीठात अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. कुस्ती स्पर्धेचे आयोजकत्व विद्यापीठाने स्विकारत जय्यत तयारी केली आहे. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ माँसाहेब सभागृहात चार मॅटवर 22 ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये आंतरविद्यापीठीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत देशभरतील 172 विद्यापीठातून 1 हजार 979 मल्ल सहभागी होणार आहेत. फ्री स्टाईल व ग्रिको रोमन या दोन प्रकारातील कुस्ती स्पर्धेचा थरात विद्यापीठात रंगणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे म्हणाले, सोमवार 23 जानेवारी सायंकाळी 4 वाजता स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आहेत. त्याचबरोबर हिंदकेसरी दिनानाथ सिंग, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ए. आय. युचे निरीक्षक डॉ. सुरेश कुमार मलिक यांची प्रमुख उपस्थिती आहे. पहिल्या दिवशी 57, 65, 74, 86 किलो वजनी गटातील सामने होणार आहेत. 23 जानेवारी रोजी 61, 70, 79, 97 किलो वजनी गटाचे सामने होतील. 24 जानेवारी रोजी 92 आणि 125 किलो वजनी गटातील मल्लांचे सामने होतील. या 10 वजनी गटात फ्री स्टाईल सामने होतील. या स्पर्धेचा बक्षिस समारंभ 24 जानेवारीला संपन्न होणार आहे.
ग्रिको रोमन स्पर्धा 27 ते 29 जानेवारी दरम्यान होतील. 27 जानेवारीला 55, 63, 72, 82 या वजनी गटातील स्पर्धा होतील. 28 जानेवारीला 60, 67, 77, 97 या वजनी गटातील सामने होणार आहेत. 29 जानेवारीला 87 आणि 130 किलो वजनी गटातील सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचा बक्षिस समारंभ 29 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता होईल. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील एकूण 50 पंचांची नियुक्ती केली आहे. या स्पर्धेतून खेलो इंडिया स्पर्धेसाठी खेलो इंडिया स्पर्धेसाठी पहिल्या 8 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलगुरू डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, डॉ. अभिजीत वणिरे आदी उपस्थित होते.
विद्यापीठातील 20 मल्ल
कोल्हापूर, सांगली, सातारा या जिह्यातील 20 मल्ल सहभागी होणार आहेत. एका जागेवर बसून सर्वांना कुस्ती स्पर्धा पाहता याव्या आणि सर्वांना गुण पाहता यावे यासाठी इलेक्ट्रॉनिक बोर्ड लावण्यात आला आहे. सर्व सामने विद्यापीठाच्या शिववाहिनी या युटय़ुब चॅनेलवर दाखवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी 50 पंचाची नियुक्ती केली आहे. सर्व मल्लांची राहाण्याची व्यवस्था विद्यापीठांच्या वसतीगृहात आणि गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे.
कुस्ती स्पर्धेत कोणाचे वर्चस्व राहणार
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरला कुस्ती पंढरी म्हणून ओळखले जाते. कोल्हापुरातील तालमींमध्ये देशभरातील मल्ल येवून कुस्तीचा सराव करतात. येथील वातावरण कुस्तीच्या सरावासाठी चांगले असल्याने पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशचे मल्लही येथे येतात. देशभरातील कुस्ती स्पर्धेत हरियाणा, पंजाब, महाराष्ट्रातील मल्लांचे वर्चस्व असते. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात होणाऱया कुस्ती स्पर्धेत कोणाचे वर्चस्व राहणार याकडे देशभरातील विद्यापीठाच्या नजरा लागल्या आहेत.