महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे होणार स्पर्धा : जिल्हा स्तरावर स्पर्धेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांच्या संकल्पनेला आकर्षक बक्षीस
अहिल्या परकाळे/कोल्हापूर
नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे समाजासह विद्यार्थ्यांच्या कौशल्यासंदर्भात संकल्पना काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा स्तरावर ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना आपल्या संकल्पनेतील अभ्यासक्रम सुचविण्याची संधी मिळणार असून, यातून स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. परिक्षणानंतर पहिल्या तीन स्पर्धकांच्या कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमाच्या संकल्पनेला आकर्षक बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेत शासकीय किंवा खासगी आयटीआय कॉलेजमधील कोणत्याही विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवण्याची संधी आहे. स्पर्धकांना वयाची कोणतीही अट नसून, राज्य शासनाच्या माहिती पत्रकातील क्युआरकोड स्कॅन करून किंवा शासनाच्या लिंकवर स्पर्धेसाठी नावनोंदणी करता येते. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी शेती व्यवसाय, स्वयंरोजगार, महिला रोजगार, उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यासक्रम, तसेच अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सूचवायचे आहेत. आपण सुचवलेल्या कौशल्य अभ्यासक्रमाची शासनाने अंमलबजावणी का केली पाहिजे, यासंदर्भात सबळ पुरावे देणे आवश्यक आहे.
प्रत्येक तालुक्यातून एकाची तर जिल्हा स्तरावरून पहिल्या तीन स्पर्धकांच्या कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची निवड केली जाईल. तालुका स्तरावर निवडलेल्या स्पर्धकांची 18 ते 19 नोव्हेंबर दरम्यान जिल्हा स्तरावर स्पर्धा घेतल्या जातील. तज्ञ परीक्षण समितीच्या परीक्षणानंतर प्रथम क्रमांकास 5 हजार रुपये व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास 3 हजार रुपये व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास 2 हजार रुपये व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येईल. जिल्हा स्तरावरील स्पर्धेचा अहवाल राज्य शासनाच्या व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाला पाठवला जाईल.
‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेतून समाजासह विद्यार्थ्यांना काय हवे आहे, याची माहिती संचालनालयाला मिळेल. त्यातून नवीन अभ्यासक्रम सुरु करुन, व्यवसाय सुरू करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच नवसंकल्पनांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर करून व्यवसाय सुरू करण्यात येणार आहे. संधीही मिळवून देण्याचा शासनाचा उद्देश आहे.
अशी असणार परीक्षण समिती
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी समितीचा अध्यक्ष असेल. जिल्हय़ातील औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी, जिल्हय़ातील महात्मा गांधी नॅशनल फेलो, जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सदस्य असतील. ही परीक्षण समिती सादरीकरणाचे मूल्यमापन करून सर्वोत्कृष्ट संकल्पना असलेल्या पहिल्या तिघांची निवड करून, राज्य शासनाला त्याची माहिती देणार आहेत.
तालुकास्तरावरील स्पर्धा 15 नोव्हेंबरपूर्वी
कोल्हापूर जिल्हय़ात शासकीय आयटीआय कॉलेज 12 तर खासगी 51 आहेत. या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरावरील स्पर्धा 15 नोव्हेंबरपूर्वी घेणार आहे. त्यानंतर 18 व 19 नोव्हेंबरला जिल्हास्तरीय स्पर्धा होतील. यातून विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना प्रोत्साहन मिळेल, एवढेच नाही तर रोजगारही मिळेल. – महेश आवटे (प्राचार्य, आयटीआय )