कोल्हापूर प्रतिनिधी
आपल्या शैलीदार खेळाने देश-विदेशातील फुटबॉल मैदानात सासत्याने दमदार खेळी करुन प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला कोल्हापूरचा स्टार फुटबॉल खेळाडू अनिकेत जाधवला देशातील नामवंत ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबमधून खेळण्याची संधी मिळाली आहे. दोनच दिवसांपूर्वी क्लबने अनिकेतला करारबद्ध केले आहे. दोन वर्षासाठीच्या या करारानुसार अनिकेतला आता 2 कोटी 35 लाख रुपये क्लबकडून मिळणार आहेत. व्यावसायिक संघासाठी करारबद्ध होऊन कोटय़वधीच्या घरात मानधन मिळणारा अनिकेत हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला फुटबॉलस्टार ठरला आहे.
17 वर्षाखालील मुलांच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत अनिकेतने भारतीय संघातून खेळताना शानदार खेळ करुन देशवासियांची शाब्बासकी मिळवली. त्याची दखल घेऊन भारतीय फुटबॉल महासंघाने आपल्या ऑरेंज संघात त्याला स्थान देऊन महिना 50 हजार रुपये मानधन सुरु केले. अनिकेत हा त्याकाळी मैदानात स्ट्रायकर म्हणून खेळत होता. विविध स्पर्धांमधील त्याचा खेळ पाहून खुष झालेल्या जमशेदपूर फुटबॉल क्लबने 90 लाख रुपयांचा करार करुन अनिकेतला संघात स्थान दिले. या संघातून खेळतानाही दाखवलेल्या कौशल्याची दखल थेट जर्मनीतील ब्लॅक बर्न रोव्हर्स संघाने घेऊन त्याला आधुनिक प्रशिक्षण घेण्यासाठी निमंत्रित केले. येथे झालेल्या सराव शिबिरात त्याला नावाजलेल्या प्रशिक्षकांकडून फुटबॉलचे आधुनिक धडे तर मिळालेच शिवाय जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंसोबत सामने खेळताना भावी काळात आपल्याला फुटबॉल कसा खेळावा लागेल याचा अनुभव मिळाला.
सुदैवाने याच काळात अनिकेतला हैदराबाद फुटबॉल क्लबने करारबद्ध केले. या क्लबशी 3 वर्षासाठी झालेल्या करारानुसार त्याला सव्वा कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. या क्लबकडून इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) अनिकेतने हैदराबाद क्लबकडून 20 सामने खेळले. यापैकी 3 सामन्यात 3 गोल करतानाच अन्य सामन्यांमध्ये चार गोलसाठी सोबतच्या खेळाडूंना साधेसोपे पास दिले. अनिकेतच्या खेळावर बेहद खुश झालेले भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीमॅक आगोर यांनी त्याला बहरीन व बेलारुस येथे भारतीय फुटबॉल संघातून मैत्रीपूर्ण सामने खेळण्याची संधी दिली. अनिकेतचा खेळातील आजवरचा चढता आलेख पाहूनच ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबने क्लबकडून खेळण्याचा ऑफर दिली. ही ऑफर स्वीकारुन दोनच दिवसांपूर्वी तो क्लबशी करारबद्धही झाला आहे. आता लवकरच तो क्लबच्या सरावात सहभागी होऊन स्पर्धांसाठी सज्ज होणार आहे.
अनिकेतने 10 लाख रुपयांचा दंड भरला…
हैदराबाद फुटबॉल क्लबशी केलेल्या करारानुसार अनिकेतला अजून 1 वर्षे क्लबकडून खेळावे लागणार होते. मात्र ईस्ट बंगाल क्लबशी करारबद्ध होताना त्याला हैदराबाद क्लबशी करार मोडावा लागला. हा करार मोडताना त्याला क्लबच्या नियमांनुसार 10 लाख रुपये दंड भरावा लागत होता. पण ईस्ट बंगाल क्लबकडून खेळण्यासाठी मिळालेल्या संधीला महत्व देत त्याने हैदराबाद क्लबकडे 10 लाख रुपये दंडाची रक्कम भरली आहे.