आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली खंत : अतिवृष्ठी व महापूरात राज्यात 100 बळी : शासनाने पूरस्थिती गांभिर्याने घेण्याची गरज
प्रतिनिधी/कोल्हापूर
सद्यस्थितीत राज्यावर अतिवृष्टी व महापूराचे संकट आहे. या काळात उपाययोजना करण्यासाठी शासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात पूर आपत्तीचे 100 नागरीक बळी ठरले आहेत. आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी आपत्तीच्या काळात मदत व पुनर्वसनमंत्री नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल अशी खंत माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
आमदार पाटील यांनी अतिवृष्टी व महापुराच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन पूर आपत्तीच्या उपाययोजनांबाबत कशा प्रकारे नियोजन केले आहे याचा आढावा घेतला. पूरबाधित गावांतील नागरीकांचे स्थलांतर, जुलै महिन्यात बाळंतपण अपेक्षित असणाऱया सुमारे 1200 महिलांची वैद्यकीय सुविधा, नदीकाठावर असणाऱया महावितरणच्या रोहित्रांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, पूरबाधित गावातील नागरीकांना आरोग्य सुविधा, जनावरांचे स्थलांतर आणि चारा छावणी आदी बाबींचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱयांना आवश्यक सूचना दिल्या.
क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचे बिल द्यायचा माझा काय संबंध?
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीदरम्यान मी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बंडखोर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी घरी जेवायला बोलावले. पण मला नंतर समजले की या जेवणाचे पैसे त्यांनी तत्कालिन पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून घेतले असा आरोप शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात केला होता. याबाबत आमदार सतेज पाटील यांना विचारले असता, क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचे बिल द्यायचा माझा काय संबंध आहे ? त्याचे पैसे मी दिलेले नाही. हा राजकीय आरोप आहे. एवढय़ा खालच्या पातळीवर जाऊन टिका करणे संयुक्तीक नाही. मला जेवण द्यायचे असते तर मी माझ्या घरी दिले असते, अशी स्पष्टोक्ती आमदार पाटील यांनी केली.