शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर; खेडमधील संतोष जाधव; चिपळुणातील अमोल टाकळे यांचा समावेश
चिपळूण प्रतिनिधी
राज्य शासनाकडून गुरूवारी 2021-22च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक प्रवर्गात संतोष जाधव आणि अमोल टाकळे या दोघांचा पुरस्कार यादीत समावेश असून जिल्हय़ात केवळ दोघांचाच या यादीत समावेश आहे.
समाजाची निस्वार्थी भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱया व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱया शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. मागील वर्षाच्या या पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्राथमिक, माध्यमिकसह एकूण 7 प्रभागात प्रवर्गनिहाय एकूण 108 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड जाहीर केली. यामध्ये प्राथमिक प्रवर्गात खेड तालुक्यातील धामणदेवी येथील आदर्श शाळा क्र. 1चे संतोष दत्ताराम जाधव, तर माध्यमिकमध्ये चिपळूण तालुक्यातील टेरव येथील सुमन विद्यालयाचे अमोल शशिकांत टाकळे अशा दोघांची राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.