खराब प्रकाशामुळे खेळ लवकर गुंडाळण्याची वेळ
वृत्तसंस्था/ सिडनी
सिडनी क्रिकेट मैदानावरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात बुधवारी चांगली झाली. मार्नस लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्यांनी 2 बाद 147 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ऍनरिक नॉर्त्जेने दोन्ही बळी टिपले. त्याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 10 धावांवर आणि लाबुशेनला दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर 79 धावांवर बाद केले.
पाऊस आणि अंधुक प्रकाश यामुळे अंतिम सत्रात खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा सलामीवीर ख्वाजा 54 धावांवर खेळत होता आणि स्टीव्ह स्मिथ एकाही चेंडूचा सामना करू शकला नव्हता. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न आणि ब्रिस्बेनमध्ये विजय मिळवून मालिका जिंकल्याने या सामन्याला मालिकेच्या दृष्टीने फारसे महत्त्व राहिलेले नाही. परंतु पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाला आणखी एक विजय मिळाला, तर ते जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करू शकतात.
त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डील एल्गारने मालिकेत तिसऱयांदा नाणेफेक गमावली, तर ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने सलग पाचव्यांदा नाणेफेक जिंकण्यात यश मिळवून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला स्वस्तात गमवावे लागले. त्याला फक्त 10 धावा काढता आल्या. सुरुवातीच्या दोन चौकारांनंतर वॉर्नरने गोलंदाज नॉर्त्जेच्या एका चेंडूवर स्लीपमध्ये अष्टपैलू जॅन्सनला झेल दिला. त्यानंतर लाबुशेन व ख्वाजा यांनी दुसऱया गडय़ासाठी 135 धावांची भागीदारी करून डाव सावरला. नॉर्त्जेने लाबुशेनला 79 धावांवर झेल देण्यास भाग पाडून ही भागीदारी मोडली आणि दक्षिण आफ्रिकेला किंचित दिलासा दिला.
त्यापूर्वी, उपाहारानंतरच्या दुसऱया चेंडूवर हार्मरच्या गोलंदाजीवर ख्वाजा पायचित असल्याचा निर्णय दिला होता. परंतु पुनरावलोकनात चेंडू ग्लोव्ह्जना चाटून गेल्याचे स्पष्ट झाल्याने तो निर्णय फिरविण्यात येऊन त्याला नाबाद ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 40 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनच्या चेंडवूर लाबुशेनचा चेंडू स्लिपमध्ये पकडल्याचा निर्णय देत मैदानावरील पंच पॉल रॅफेल यांनी त्याला बाद ठरविले होते. तथापि, निर्णयाचे पुनरावलोकन करण्यात आले असता स्लीपमध्ये चेंडू पकडण्यापूर्वी त्याने जमिनीला स्पर्श केल्याचा निर्णायक पुरावा असल्याचा निष्कर्ष तिसऱया पंचांनी काढल्याने त्यावेळी 70 धावांवर असलेल्या लाबुशेनला नाबाद ठरविण्यात आले. पण याचा त्याला फारसा फायदा उठवता आला नाही. आणखी 9 धावांची भर घातल्यानंतर तो 79 धावांवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया पहिला डाव 2 बाद 147 डेव्हिड वॉर्नर 10 (11 चेंडूंत 2 चौकार), मार्नस लाबुशेन 79 (151 चेंडूंत 13 चौकार), उस्मान ख्वाजा नाबाद 54 (121 चेंडूंत 6 चौकार), ऍनरिच नॉर्त्जे 2-26.