आंध्रप्रदेशात पार पडले यशस्वी परीक्षण
वृत्तसंस्था / अमरावती
भारतीय वायुदलाने आंध्रप्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-16 वर निर्मित 4.1 किलोमीटर लांबीच्या आपत्कालीन लँडिंग स्थळावर गुरुवारी विमान उतरविण्याचे यशस्वी परीक्षण केले आहे. परीक्षणात परिवहन विमान एएन-32, दोन सुखोई लढाऊ विमाने आणि दोन तेजस लढाऊ विमानांनी भाग घेतला आहे.
महामार्गावरील धावपट्टी विमानांच्या लँडिंगसाठी पूर्णपणे तयार आहे. धावपट्टीवर लोक तसेच प्राण्यांचा प्रवेश रोखण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुंपण घालण्यासह काही कामे अद्याप प्रलंबित आहेत. धावपट्टीवर विशिष्ट खुणा तयार करण्याच्या कामाबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांसोबत चर्चा केल्याची माहिती वायुदलाच्या अधिकाऱयाने दिली आहे.
परीक्षणादरम्यान मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवार सकाळपासून दुपारपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली होती. परीक्षणादरम्यान विमानाने यशस्वी उड्डाण केल्याचे बापटलाचे पोलीस अधीक्षक वकुल जिंदल यांनी सांगितले आहे.
कोरीसापाडुमध्ये राष्ट्रीय महामार्ग-16 वर 4.1 किलोमीटर लांबीची आणि 33 मीटर रुंदीची काँक्रिटची धावपट्टी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 23.77 कोटी रुपये खर्च तयार करण्यात आली होती. आपत्कालीन स्थितीत येथे विमानांचे लँडिंग करता येणार आहे. 2018 मध्ये केंद्र सरकारने देशभरात अशाप्रकारच्या राष्ट्रीय महामार्गांवर 11 धावपट्टय़ा निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता.