ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) जे काही बोलले ते खरं असल्याचे सांगून पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्रातील राजकिय कोंडी फुटण्यास मदत झाली. अशी प्रतिक्रिया दिली. तसेच पहाटेच्या शपथविधी नंतर झालेल्या राजकिय घडामोडीनंतरच महाविकास आघाडीची (MVA) सत्ता आली यासाठी अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांचे आभार मानले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे (NCP) अध्यक्ष आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना ‘पहाटेचा शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठल्याचा फायदा झाला’ असे विधान केले. नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी याविषयी विचारले असता ते म्हणाले, “हे खरय की पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्रातील राजकिय कोंडी फुटली. त्यावेळी दिल्ली आणि महाराष्ट्रात असलेल्या सरकारने महाविकास आघाडीचे सरकार येणार याची चाहूल लागताच राष्ट्रपती राजवट लावून महाराष्ट्राची कोंडी केली होती.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “जरी महाविकास आघाडीने बहूमत दाखवले असते तरी राज्यपालांनी बहूमताची डोकी मोजायलाच 5 वर्षे लावली असती. ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने काम केले त्याच प्रकारे राज्यपालांनी आपले काम केले असते.” असा दावा त्यांनी केला
“दिल्लीतून कायम महाराष्ट्रावर हल्ले झाले आहेत हा इतिहास आहे. या आक्रमणाविरूध्द महाराष्ट्र कायम लढत आला आहे. औरंगजेब आणि खान यांच्याशी लढून हा महाराष्ट्र निर्माण झाला आहे. शिवसेना ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवसेनेवरही असाच हल्ला दिल्लीतून होत आहे. महाराष्ट्राला लढण्याशिवाय काहीच मिळाले नाही, त्यामुळे लढणे आमच्या स्वभावात आहे. इथून पुढेही लढू.” अश्या भावना संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.
Previous Articleपहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली
Next Article शरद पवारांनीच शिवसेना संपविण्याची सुपारी दिली
Related Posts
Add A Comment