हिवाळय़ात, कडाक्याच्या थंडीत शेकोटीची ऊब घेण्याचा आनंद काही औरच असतो, हा सर्वांना येणारा अनुभव आहे. पण शेकोटीच्या धुरात अधिक काळ राहिल्यास वेगवेगळे विकारही होऊ शकतात, असे तज्ञांचे मत आहे. शेकोटी कोणते पदार्थ जाळून बनविलेली आहे यावर या विकारांची तीव्रता अवलंबून असते, असे सांगितले जाते. ती साध्या लाकडांची असेल तर विकारांची तीव्रता कमी असते.

तथापि, प्लॅस्टिकचे तुकडे, किंवा पिशव्या, कोळसा आदी पदार्थ शेकोटीत घातल्यास तिचा धूर घातक ठरून कित्येकदा तो प्राणावरही बेतू शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे, असाही सल्ला तज्ञ देतात. असे पदार्थ जाळून केलेल्या शेकोटीचे दुष्परिणाम एकदम लक्षात येत नाहीत. मात्र, सातत्याने हा धूर नाकातून फुप्फुसात गेल्यास अस्थमा होणे किंवा बळावणे, रक्तातील लोहक्षार कमी होऊन हेमोग्लोबिनचे प्रमाण घटणे किंवा क्वचित प्रसंगी हृदयविकाराचा झटका येणे असे गंभीर विकारही होऊ शकतात, असे संशोधकांकडून बजावण्यात आले आहे. त्यामुळे शेकोटी आरोग्यदायक पद्धतीनेच पेटवावी, असे त्यांचे म्हणणे आहे.