संशयितांच्या अटकेसाठी होंडा पोलीस चौकीवर स्थानिकांचे ठाण
प्रतिनिधी /वाळपई
होंडा येथे रविवारी सायंकाळी 4 वाजणच्या सुमारास अज्ञात तरुणांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱया एका कर्मचाऱयाला मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे सदर तरुणाला अटक करण्यासाठी होंडा भागातील तरुण मोठय़ा प्रमाणात होंडा पोलीस चौकीवर जमा झाले होते. संशितीला अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे न सोडण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत सदर तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न स्थानिक पोलीस अधिकारी करीत होते.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार होंडा येथे पेट्रोल पंपावर अनोळखी तरुण गाडीच्या चाकामध्ये हवा भरण्यासाठी आले होते. मात्र हवा भरण्यासाठी काही वेळ उशीर झाल्यामुळे ते संतप्त बनले. यावेळी पेट्रोल पंपावर काम करणाऱया कर्मचाऱयांबरोबर त्यांची बाचाबाची झाली. याचवेळी सदर तरुणांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱया महादेव गावकर यांना मारहाण केली. यामुळे सदर पंपावर काम करणारे इतर कर्मचाऱयांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदर तरुण पळून गेले. सदर तरुण हे मापसा भागातील असल्याचे एकूण त्यांच्या गाडीच्या नंबर वरून स्पष्ट झालेले आहे. मात्र त्यांचा पत्ता लागलेला नाही.
स्थानिकांनी धाव घेऊन कर्मचाऱयांची मदत केली
दरम्यान सदर प्रकार 4 वाजण्याच्या सुमारास घडला. पेट्रोल पंपावर अचानकपणे बाचाबाची झाल्याचे पाहून स्थानिकांनी धाव घेऊन कर्मचाऱयांची बाजू घेतली. मात्र अज्ञानानी सदर भागातून पलायन केले. एकूण चार वाहनातून तरुण आले होते. मद्यधुंद अवस्थेत ते होते. स्थानिकामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱयांचा जीव वाचला. सदर तरुणांकडे सूरी व चाकू होते, अशी माहिती महादेव गावकर यांनी दिली.
होंडा पोलीस चौकीवर जमाव
दरम्यान सदर तरुणांनी पलायन केल्यानंतर होंडा भागातील ग्रामस्थांनी व कर्मचाऱयांनी होंडा पोलीस चौकीवर धाव घेऊन संशयितांवर कारवाई करण्याची मागणी केली. संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत होंडा पोलीस चौकी न सोडण्याचा इशारा यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱयांना दिला. यामुळे रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न स्थानिक पोलीस यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याला अटक केली नव्हती. पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते व इतर अधिकारी तपास करीत आहेत.