श्रीमंत शाहू छत्रपती यांचे गौरवोद्गार : ‘लोकमान्य’च्या दसरा चौक शाखा नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा उत्साहात उद्घाटनप्रसंगी – संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांची उपस्थिती

प्रतिनिधी /कोल्हापूर
विश्वासार्हता, पारदर्शकता, सहकारिता व व्यावसायिकता हे ब्रीद वाक्य घेऊनच, लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑप सोसायटीच्या प्रगतीची घौडदौड चार राज्यात सुरू आहे. ‘लोकमान्य’ नावाप्रमाणे ही संस्था लोकप्रिय झाली आहे. दिवसे दिवस वाढत असलेल्या ठेवी विश्वासाच धोतक आहे. अर्थ, सहकार क्षेत्राबरोबर सामाजिक बांधिलकी जपत सुरू असलेले लोकमान्यचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी काढले.
लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑप सोसायटी येथील दसरा चौक शाखेचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा बुधवारी येथे झाला. यावेळी अध्यक्षपदावरून श्रीमंत शाहू छत्रपती बोलत होते. यावेळी लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष आणि ‘तरूण भारत’ समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी वर्ग आणि ठेवीदार, हितचिंतक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या ठेवी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहेत. या ठेवीबरोबर सामाजिक कार्याची ही भान ठेवून समाज कार्यही हाती घेतले आहे. यामुळे चार राज्यात या संस्थेची प्रगती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
सिमाप्रश्न मिटविण्यासाठी किरण ठाकुर यांनी लक्ष घालावे
छत्रपती राजाराम महाराजांनी महाराष्ट्र-कर्नाटकाबरोबर तेलगंणा राज्यात आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. यामुळे त्यांना देशात राजे म्हणून असा सन्मान मिळत होता. गेली साठहून अधिक वर्षे कर्नाटककडून सिमाभागातील मराठी भाषकांवर अन्याय केला जात आहे. लोकशाही मार्गाने अन्यायाविरोधात लढणाऱया सिमावासीयांना न्याय मिळण्याची गरज आहे. सिमाप्रश्न सलोख्याने मिटविण्यासाठी किरण ठाकुर यांनी लक्ष घालावे, असे आवाहनही श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केले. यावेळी त्यांनी लोकमान्यच्या कोल्हापूरातील या पहिल्या शाखेचे उद्घाटन आपल्या हस्ते केल्याची आठवणी त्यांनी करून दिली.
कोल्हापुरात शिक्षण संस्था उभारणार : किरण ठाकुर
कोल्हापूर जिल्हा हा देशातील अग्रेसर जिल्हा आहे. मेहनती कार्यकर्त्यांचा मोहोळ असल्याने, कोल्हापूर हे सहकाराची पंढरी ठरली आहे. या पंढरीत लोकमान्यतर्फे शिक्षण संस्था उभारणार असून सहकारी तत्वावरील शेती अर्थात को-ऑपरेटिव्ह फार्मिंगची संकल्पना पुण्यात साकारणार असल्याची घोषणा लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष व तरूण भारत समूह प्रमुख सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी या कार्यक्रमामध्ये केली.
किरण ठाकुर म्हणाले, लोकांचा आता बँकापेक्षा लोकमान्य सोसायटीवर विश्वास बसत असल्याने ठेवीचा ओघ वाढत आहे. संस्थेच्या कोल्हापूरातील पहिल्या शाखा उद्घाटनप्रसंगी एकावेळी पाच शाखांचे उद्घाटन करण्याचे रेकॉर्ड ‘लोकमान्य’नेच केले आहे. पुण्यात जे विकले जाते ते देशात व जगात ही विकले जाते. . यानुसार लोकमान्यचे हेड क्वॉर्टर आता पुण्यात सुरू होत आहे. भविष्यात लोकमान्य सोसायटीचा देशभरात विस्तारीत करण्याचा मानस आहे. अर्थ, सहकारात कार्य करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही लोकमान्य करत आहे.
इंग्रज नसते तर देशावर मराठयांचे राज्य असते
छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशभरात दरारा होता. छत्रपती राजाराम महाराजांनी देशभर मराठा साम्राज्याचा विस्तार केला. रणरागिणी छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्यामुळे महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला एक वेगळे महत्व आले, याचा धागा पकडत किरण ठाकुर यांनी इंग्रजांचे राज्य नसते तर देशावर मराठय़ांचे राज्य असते असे माजी मंत्री शशी थरूर यांनी आपल्या एका भाषणात सांगितल्याचा दाखला देत मराठा साम्राजाच्या शक्तीची माहिती दिली.
प्रास्ताविकात लोकमान्यचे संचालक पंढरी परब म्हणाले, 1995 मध्ये पतसंस्था म्हणून स्थापन केलेली ही संस्था आता 2007 मध्ये मल्टीस्टेट बनली. यामुळे शाखांचा विस्तार होऊन, कोटयवधीच्या ठेवी जमा होऊ लागल्या आहेत. ठेवी तसेच सर्वसामान्यांची पत वाढवण्याबरोबर सामाजिक क्षेत्रात सुध्दा ही संस्था काम आहे.
रिजनल मॅनेजर दिलीप पाटील यांनी या रिजनमध्ये 23 शाखा असून, 400 कोटीपेक्षा अधिक ठेवी असल्याचे सांगितले.
प्रारंभी श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते फीत कापून शाखा नूतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मेजर जनरल ए.बी. सय्यद, कर्नल (निवृत) विजयसिंह गायकवाड, ब्रिगेडियर समीर साळोखे, लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आभार असिस्टंट जनरल मॅनेजर आर.डी. पाटील यांनी केले.
कार्यक्रमास व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, सुबोध गावडे, चीफ फायनान्स ऑफिसर वीरसिंग भोसले, सीईओ अभिजीत दीक्षित, उद्योजक करण माने, ‘तरुण भारत’चे निवासी संपादक मनोज साळुंखे, बँक ऑफ बडोदाचे सहाय्यक महाप्रबंधक प्रखर कुमार, शिवाजी चौक शाखेचे मुख्य प्रबंधक पंकज इंगळे, सनी तोरस्कर, लोकमान्य सांगली विभागाचे क्षेत्रिय व्यवस्थापक सुदत्त पाठक, सहाय्यक क्षेत्रिय व्यवस्थापक पी.एस.पाटील, वरीष्ठ व्यवस्थापक सुभाष मोरे, दसरा चौक शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद जाधव, व्यवस्थापक स्वाती चौगुले, स्वप्नील पाटील, महेश कुंभार, सुशिल पाटील, केदार पाटील आदी स्टाफसह तनिष्कचे मालक प्रसाद कामत, जय कामत, बाळासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते उदय घोरपडे व ठेवीदार, हितचिंतक आदी उपस्थित होते.