ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना आज कोरोनामधून बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यपाल कोश्यारी यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असते. शिवसेनेत फूट पडल्याने राजकीय उलथापालथ झाली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी भाजप बरोबर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरेल, कारण सरकार स्थापनेचा किंवा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांकडेच असतो. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
राज्यात दिवसेंदिवस बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये पक्षांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटी येथे तळ ठोकून बसले असून ते आज दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची पुन्हा बैठक घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत बंडखोरांकडून पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. काल ही अशाच प्रकारची बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.
