ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार होती. मात्र, पाचमधील एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची सुनावणी 10 जानेवारीला होण्याची शक्यता आहे.
सुभाष देसाई यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर 1 नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं होतं. यासाठी न्यायालयाने पक्षकारांना चार आठवडय़ांची मुदत दिली होती. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणं अपेक्षित होतं. पण त्यावेळी न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे रजेवर असल्याने सुनावणी होऊ शकली नव्हती.
अधिक वाचा : बंगालच्या उपसागरात आणखी एक वादळ
वैधानिकदृष्या ठाकरे गटासाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांनी यावर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात केली आहे. मात्र, 13 डिसेंबरला हे प्रकरण केवळ अनौपचारिक निर्देशांसाठी ऐकलं जाण्याची शक्मयता आहे. या प्रकरणावर 10 जानेवारीपासून सुनावणी होऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.